दहा एक वर्षाची असेल ती. पलंगावर पालथी पडून काहीतरी वाचत होती. आपल्याच नादात पुस्तकाची पानं पलटत होती. त्यांच्या दुकानातला नोकर तिथेच काहीतरी काम करत होता. तिच्या लहानपणापासून त्यांच्याकडे कामाला होता तो, अगदी विश्वासू , वेळ पडली की काहीतरी आणून देणारा, दुकानातली, घरातली पडेल ती काम करणारा. तरुण होता, अजुन लग्न झालेले नव्हते. त्याच्यासाठी मुली पहातायत अस काहीतरी आई म्हणायची. तिला फार समजायचं नाही.

तिला मांडीच्या मागच्या बाजूला हाताचा स्पर्श झाल्याचे तिला जाणवले. अगदी दोन सेकंदांचा स्पर्श असेल पण काहीतरी विचित्र होता तो. नेहमीसारखा नाही. काहीतरी असेल असं म्हणुन तिने किंचित मागे पाहुन परत आपल्या पुस्तकात तोंड खुपसले. दोन मिनिटांनी मात्र तिला कुल्ल्यावर चक्क चिमटा घेतल्याचे जाणवले. आता मात्र ती हडबडली. खोलीत फक्त ती आणि नोकर होते. तिने मागे पाहुन त्याला विचारले,'तू घेतलास का मला चिमटा"? " नाही बा, मी तर काम करतो आहे" आणि तो  काहीतरी गुणगुणत परत कामाला लागला. भास आणि सत्य यातला फरक ओळखता येत होता तिला. त्याचंच काम होत हे. स्पर्शाची घृणा कळण्याचं वय नव्हतं तिचं पण काहीतरी विचित्र वाटून गेलं तिला नक्की. का केलं असेल त्याने हे? आईला सांगावं की नाही या विचारात पडली ती. म्हणाल तर छोटी गोष्ट होती, पण तिच्या इवलूश्या विश्वात बरीच उलथपालथ केली त्या प्रसंगाने.

एक दोन वर्षात ती "मोठी" झाली आणि शेजार्यांचा तरुण मुलगा बोळातून जाताना मुद्दाम अंगाशी लगट करुन का जातो, बस कंडक्टर उरलेले पैसे हातात देताना अंमळ थोडा जास्तच वेळ हात हातात का ठेवतो,  रेंगाळवतो, हे तिला हळूहळू समजायला लागले. आधीच लाजाळु स्वभाव , त्यात असलं काही कोणाला सांगायची सोय नव्हती. आई अजुनच काळजी करत बसली असती. म्हणुन मग हे सर्व काही "पार्ट ऑफ (वूमन्स ) लाईफ म्हणून चालु राहिले.

आजीचा मऊ सायीच्या हाताचा स्पर्श , रात्री  झोपताना बाबांचा मायेने डोक्यावर फिरणाऱ्या हाताचा स्पर्श, भांडताना झालेला भावाचा धसमुसळा स्पर्श मनाच्या रस्त्यावर मागे पडले आणि हे सहेतुक, विकृत , वासनेने बरबटलेले स्पर्श ड्रायव्हर्स सीट वर बसले.

एका उन्हाळ्याच्या सुट्टीत लांबच्या काकांकडे ती गेलेली असताना तिला आईची आठवण आली. काकांनी तिचं रडणं थांबवायला तिला जवळ घेतलं आणि तिच्या अंगावरुन त्यांचा हात फिरू लागला. तिला पटकन त्या दिवशीच्या चिमट्याची आठवण झाली आणि ती "आता नाही येत आहे आठवण" अस म्हणुन बाजूला झाली.

एकदा मावशीच्या घरी रहायला गेलेली असताना लग्न झालेला, दोन मुलं असलेला मावसभाऊ मध्यरात्री फक्त तिचच पांघरूण नीट करायला तिच्या बेडपाशी का येऊन गेला ते तिला आता हळूहळू कळायला लागलं. त्या घरी दोन्ही रात्री मग तिने टक्क जाग राहुन काढल्या. सुट्टीत शक्यतो कोणाकडे जाणं ती टाळू लागली. सुंदर स्पर्श जणु आयुष्यातुन बाद झाले आणि  वासनेच्या स्पर्शातून सटकायचे कसे हेच ध्येय होऊन बसले.

कालांतराने लग्न ठरले. तोपर्यंत स्पर्शाचे अजुन काही अनुभव आले. काही बरे, वाईट, काही मनाच्या कुपीत दडवून ठेवावेसे, काही विसरायची इच्छा असुनही न विसरता येण्यासारखे, काही वासनांध, काही निखळ. नवऱ्याने पहिल्याच स्पर्शात फुलवले, चेतवले आणि आणि त्याच्या आश्वासक , प्रेमाच्या स्पर्शाने आत्तापर्यंतचे वाईट, शिसारी आणणारे अनुभव मनाच्या तळाशी गेले. ते पूर्ण नष्ट होत नाहीत, कधीतरी ढवळून निघतात पण पाणी संपुर्ण गढूळ होणार नाही याची तरी काळजी घेतात.
आज तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस. तिच्या लेकीचा जन्म. दिवसभराच्या कोडकौतुकानी खूप थकलेली असली तरीही रात्री फक्त त्या दोघी एकमेकींजवळ असताना तिने आपल्या लेकीच इवलस बोट धरुन तिने तिला एक वचन दिले. "स्पर्श सुंदर असतात बाळा आणि वाईट ही. माझ्या प्रेमातून तुला या दोन्हींशी व्यवस्थित ओळख मी तुला करुन देईन. त्यांच्याशी "डील" करायचं बळ मी तुला देईन. कुठल्याही क्षणी तुला काही विचित्र वाटलं तर ते बोलुन दाखवायला , व्यक्त करायला मी तुला शिकवेन. अगदीच बोलली नाहीस तरी मन कायमच गढूळ करुन घेणार नाहीस अस आत्मबळ मी तुला देईन. एका आईच प्रॉमिस आहे हे तुला. तुझ्या जागी मुलगा झाला असता तरी मी त्याला हेच सांगणार होते." लेकीला जवळ घेऊन तिचा तो कोवळा स्पर्श ती मनात साठवत राहिली.

तळे आज स्वच्छ आणि नितळ दिसत होते.
Gauri Brahme
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel