औषधीशास्त्र (Pharmacology) ही औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) या विषयातील एक महत्वपूर्ण शाखा आहे ज्यामध्ये मानवी शरीरावर औषधांचा होणारा परिणाम वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासाला जातो.


मानव किंवा प्राणी यांच्या रोगाचे निदान करणे रोगांवर उपचार करणे तसेच रोगाचा प्रतिबंध करणे यासाठी वापरले जाणारे पदार्थ म्हणजे औषध होय.


जागतिक आरोग्य संघटनेनुसार औषध हा असा पदार्थ आहे जो शारीरिक क्रिया किंवा आजाराच्या स्थितीमध्ये बदल करतो जो तो घेणाऱ्यांसाठी लाभदायक असतो.


औषधांमुळे जसे रोगांपासून बचाव होतो तसे त्यांच्या अयोग्य वापरामुळे रोग उद्भवतात किंवा मृत्यूही ओढवतो. उदा., अ‍ॅस्पिरीन हे एक सुरक्षित, बहुउपयोगी औषध समजले जाते; तथापि, चुकून जास्त प्रमाणात अ‍ॅस्पिरीन घेतल्यामुळे लहान बालके मृत्युमुखी पडली आहेत. अल्कोहॉल, कोकेन, हेरॉईन आणि अन्य अंमली पदार्थांच्या सेवनाने गंभीर समस्या निर्माण होतात. सर्व ओषधे शरीरावर एकापेक्षा अधिक प्रकारे परिणाम करतात. उदा., चेतासंस्थेवरील औषधे हृदयावर अनिष्ट परिणाम करु शकतात. अशा औषधांचा हृदयावरील परिणाम सहपरिणाम मानला जातो.


औषधांचा अभ्यास करणारे वैज्ञानिक कोणताही रासायनिक पदार्थ जो सजीवांवर परिणाम करतो त्यास औषध (ड्रग) मानतात. येथे मात्र वर दाखविल्याप्रमाणे वैद्यकीय उपयोगासाठी वापरलेला पदार्थ असा औषधाचा अर्थ घेतला आहे. अल्कोहॉल, तंबाखू यांसारखे सेवन केले जाणारे शरीरावर परिणाम करणारे पदार्थही औषध मानले जातात. औषधांचे वर्गीकरण विविध प्रकारे करता येते. अवस्थेनुसार (स्थायू(solid), द्रव (liquid) व वायू(gas)), औषधे कशी घेतली जातात त्यानुसार ( तोडांने(oral), अंत:क्षेपणाद्वारे (इंजेक्शनद्वारे) किंवा हुंगून inhalers) किंवा रासायनिक संरचनेनुसार औषधांचे गट पाडता येतात. औषधवैज्ञानिक मात्र मुख्यत्वे औषधांचे शरीरावर कसे परिणाम होतात, हे पाहतात. यानुसार सामान्यपणे वेगवेगळ्या औषधांचे पुढीलप्रमाणे गट केले जातात:


१.संसर्गाला प्रतिबंध करणारा औषधे २. संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करणारी औषधे ३. हृदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणारी औषधे आणि ४. चेतासंस्थेवर परिणाम करणारी औषधे.


औषधीशास्त्रामध्ये दोन विभाग आहेत Pharmacokinetics यामध्ये शरीराद्वारे औषधांवर होणारे परिणाम अभ्यासले जातात तर Pharmacodynamics यामध्ये औषधाचा शरीरावर होणारा परिणाम अभ्यासला जातो.


सर्वप्रथम औषधांचा अभ्यास हा प्राण्यावर केला जातो व यातुन मिळणाऱ्या माहितीचा अभ्यास करून हे औषध मानवी शरीरासाठी योग्य आहे का नाही हे ठरवले जाते.


सर्व औषधांचे शरीरावर उपयुक्त किंवा घातक परिणाम होऊ शकतात. उदा., एखादे औषध हृदयाची स्पंदनक्रिया अधिक जोमदार करणारे, वेदना शामविणारे किंवा अन्य इष्ट परिणाम करणारे असते; पंरतु, तेच औषध अधिक प्रमाणात घेतल्यास शरीरावर अनिष्ट परिणाम होतात. औषधांचा परिणाम सर्व शरीरावर होतो कारण ती रक्तप्रवाहातून शऱीरभर पसरतात. त्यामुळे शरीराच्या एका भागावर परिणाम होण्यासाठी दिलेल्या औषधांचे दुसर्‍या भागांवरही चांगले-वाईट परिणाम होऊ शकतात. उदा., वेदना शमविण्यासाठी बर्‍याचदा मॉर्फीन देतात. परंतु हे मॉर्फीन मेंदू व मज्जारज्जूतील पेशींवर परिणाम करते आणि त्यामुळे वेदनांची संवेदना कमी होते. मात्र त्यामुळे श्वास मंद होणे, वांती होणे, बद्धकोष्ठता होणे असे अन्य अनिष्ठ परिणाम घडून येतात.


औषधांचे प्रतिकूल म्हणजे त्यांच्या इष्ट परिणामांशिवाय होणारे अनिष्ट सहपरिणाम तीन प्रकारचे असतात : एक पार्श्व परिणाम (साइड इफेक्ट), दुसरा अधिहर्षता परिणाम (अ‍ॅलर्जी) आणि तिसरा विषारी प्रतिक्रिया (टॉक्सिक इफेक्ट) सर्व औषधांचे पार्श्व परिणाम होत असतात. उदा. मॉर्फीनमुळे काही घातक परिणाम होतात आणि ते गृहीत असतात. रक्तदाबावरील काही औषधांमुळे डोके दुखते. बहुतेक औषधांचे पार्श्व परिणाम तीव्र नसतात आणि त्यामुळे त्या औषधांचा वापर थांबवावा लागत नाही. काही वेळा एखाद्या रुग्णाला विशिष्ट औषधाची (उदा. अ‍ॅस्पिरिन, पेनिसिलीन) अधिहर्षता असते; परंतु अधिहर्षता तीव्र असल्यास अशी व्यक्ती त्या औषधाला संवेदनशील असल्याचे मानतात. काही वेळा, औषधांमुळे विषारी अभिक्रिया घडून येते. त्यामुळे पेशींचा नाश होतो आणि प्रसंगी रुग्णाला मृत्यू ओढवतो.


ज्या व्यक्ती औषध म्हणून अल्कोहॉल, अ‍ॅफिटामाइन, बार्बिट्युरेट किंवा मादक पदार्थ मोठ्या मात्रेत घेतात, अशा व्यक्ती त्या औषधांवर अवलंबून राहतात. या औषधांच्या वापरानुसार कालांतराने शरीरात ती ‘सहन’ करण्याची क्षमता निर्माण होते आणि वापर चालू राहिल्यास ती वाढते. म्हणून इष्ट परिणाम साधण्यासाठी अशा व्यक्तींना औषधाची मात्रा वाढवावी लागते. औषधांची शारीरिक किंवा मानसिक गरज निर्माण होण्याच्या या अवस्थेला व्यसनाधीनता म्हणतात. ही औषधे घेण्याचे थांबविल्यास गंभीर आजार उद्भवतात.


शरीरातील टाकाऊ पदार्थांबरोबर औषधेही शरीराबाहेर टाकली जातात. औषधे पेशांमधून रक्तात मिसळतात आणि वृक्कात (मूत्रपिंड) पोहोचतात आणि मूत्रावाटे बाहेर टाकली जातात. घाम, अश्रू तसेच मलाद्वारेही औषधे शरीराबाहेर टाकली जातात. काही शुध्दिहारके पूर्णपणे उच्छवासातून बाहेर सोडली जातात.


औषधे सामान्यपणे व्यापारी नावांनी विकली जातात. मात्र प्रत्येक औषधाच्या वेष्टणावर, औषधनिर्मिती करणार्‍या कारखान्याचे नाव, औषधातील प्रमुख रासायनिक घटक, मिसळलेले इतर घटक, वापरण्यासंबंधी सूचना, अनिष्ट परिणाम/अधिहर्षता यांविषयी सूचना, औषधाची किंमत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधाची परिणामकारता कधी संपते ती मुदत, (समाप्ती तारीख) या बाबी नमूद केलेल्या असतात.


(संदर्भ: कुमार विश्वकोश,विकासपीडिया ,के डी त्रिपाठी फार्मकॉलॉजी)


We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे नवी मुंबई.

९७६५२६२९२६

ashishkarle101@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel