कविकल्पना कविकल्पना
काय असतात हो ह्या कविकल्पना?
वेड्यांचे चाळे की मनाचे खेळ
गगणभराऱ्या की शब्दजंजाळ?
अहो असेना का काही
देतात ना आनंद
घालतात ना फुंकर दुःखावर?
लावतात ना वेड मनाला
मग कशाला बाकी बाता
अनुभवा ना या कविकल्पना...
प्रेमाची उत्कटता विरहाचा खेद
नात्यांची गुंफण हास्याचा मोद
परखड विचार आणि
बालपणीचा सुंदर बोध
त्याला निसर्गाची जोड
अहो घ्या आनंद जा बालपणात,
करा विहार अवकाशात
घ्या मनाच्या उत्तुंग भराऱ्या
अहो ह्याच तर आहेत की कविकल्पना...
सूर्याचे तेज चंद्राची शीतलता
मृगाची चपळता सिंहाची ऐट
कडाडती विद्युल्लता
चमचमत्या चांदण्या
भाव भावनांचा सुंदर आविष्कार
म्हणजेच की हो कविकल्पना...
अहो तसं बघितल तर
आपल्यातही आहेच की एक कवी
आत खोल हृदयात दडलेला
भावनांच्या हिंदोळ्यात
कामाच्या व्यापात आणि या जगराहाटीत
कुठेतरी हरवलेला....
येऊ द्या त्याला बाहेर
उत्स्फूर्तपणे करूदे की मनाचे खेळ
होऊदेत थोडे वेडे चाळे
काय फरक पडतो?
कोण विचारणाराय, कोण बघणाराय
येऊ दे शब्दजंजाळ उतरुदे कागदावर
शेवटी ह्या तर मनातल्या भावनाच
फक्त नाव कविकल्पना....