आठवणींच्या डबक्यात
शेवाळे तयार झाले
ना मज कामी आले
ना तुज कामी आले ।।१।।
त्या डबक्यात डुंबताना
वराह मी झालो
तुज गल्लीतून बघता
श्वान मी झालो ।।२।।
तव वचनांच्या भिंतीवर
धडकता बोकड झालो
लाथाळ्या काढताना
मी गाढव झालो ।।३।।
वाघाची शेळी
तुजसाठी झालो
अन घरी मात्र
मी बैलोबा झालो ।।४।।
स्पर्श आठवता तुझा
अंगावर फिरतो हात
परी जन वेडे म्हणती
खाजरी माकडजात ।।५।।
नादात तुझ्या वेडा
रात्रीस घुबड झालो
वाट तुझी बघताना
चातक मी झालो ।।६।।
तुजसाठी झुरताना
ना कोणाचा झालो
ना मी तुझा झालो
ना माझा झालो...
ना माझा झालो...
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.