भृगु ऋषींचा आश्रम

(हरिणी)

च्यवन उदका आणि तेव्हां सती वदली कथा ।

श्रवण करुनी झाला दुःखी धरी घरच्या पथा ॥

नमन करुनी तातांलागीं कथीच सविस्तरें ।

जनक वदले त्यांना आणी घरीं अपुल्या त्वरें ॥१॥

(पृथ्वी)

तुम्ही सकलही चला मजसवें असें ऐकतां ।

जणूं शरिरिं संचरे जिवन हेंचि माझ्या मता ॥

प्रधान पति आणि ती सति निघे त्वरें घेउनी ।

मनीं मुदित जाहले निघति त्या मुनी मागुनी ॥२॥

कुमार गुरुसा दिसे प्रभु-सती भवानी शिव ।

प्रधान द्वय हे जसे दिसति शिव सूता इव ॥

प्रवेश करितां तिथें श्रवणिं येति वेद ध्वनी ।

पशू खगहि नांदती कलहद्वेष हे टाकुनी ॥३॥

तिथें तपत सूर्यही वहत वातही शांत तीं ।

असें स्थल विलोकुनी मुदित जाहला भूपती ॥

मनांत दृढभावना उपजली असे तत्त्वता ।

प्रसाद मुनिचा जरी तरिच होय कीं मुक्तता ॥४॥

(दिंडी)

अशा मंदीरीं व्याघ्रचर्म होतें । भृगू बैसति आसनीं तया तेथें ।

यां देखुनियां सोमकांत राजा । करी प्रणती हो तशी राज-भाजा ॥५॥

तसे नमिती ते दोन कारभारी । ऋषी वदती हे तयां वरद-कारी ।

भूप बोले हो ऋषी महाराज । सफल झाला हा मदिय जन्म आज ॥६॥

पूर्वजन्माचें महत्‌भाग्य साचें । म्हणुन दर्शन हें आज या पदांचें ।

मदिय वडिलांनीं महत्‌पुण्य केलें । मदिय शंकेचें समाधान झालें ॥७॥

प्रजापालन हें योग्य घडे साधो । नसे मजलाही पापकर्म बाधो ।

असें वर्तन हें आजवरी केलें । अतां दुर्गधी शरिर कसें झालें ॥८॥

व्याधिशमनार्थी यत्‍न बहू केले । परी सारेची व्यर्थ कसे झाले ।

अतां मजलाही मुक्त करा देवा । रक्षिं शरणाला लोभ असो द्यावा ॥९॥

(कामदा)

तापसी म्हणे ऐक भूपती । घोर हा नको या स्थलाप्रती ।

दुःखि येउनी मुक्त जाहले । आश्रमास या सौख्य पावले ॥१०॥

सोमकांत बा पूर्वकर्म हें । भोगणें असे जान मर्म हें ।

पूर्व-जन्मिंचें पाप कोणतें । ऐक भूपती एकचित्त तें ॥११॥

भोजनें करा स्वस्थ हो मनीं । आपुलीं मुखें म्लान होउनी ।

काननीं तुम्ही फार हिंडलां । यामुळें तुम्ही फार श्रांतलां ॥१२॥

भाषणा अशा ऐकुनी मनीं । तोषले अती शांत होउनी ।

भोजनाअधीं तैल लाउनी । स्नान घातलें उष्णजीवनीं ॥१३॥

दीधलीं तयां वस्त्रभूषणें । दीधलीं तयां मिष्टभोजनें ।

दीधलीं तयां सौख्य आसनें । एकतानता पावली मनें ॥१४॥

भूपतीसही धीर दीधला । घोर हा नसे त्यास राहिला ।

आश्रमीं जशी झोंप लागली । राजमंदिरीं नाहिं लागली ॥१५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel