भीमराजाची कथा
(गीति)
व्यासें विनीत वचनें, पुशिलें कमलोद्भवास गणपतिचें ।
मजला महात्म्य सांगें, ऐकुन कथिलें प्रसन्नशा वाचें ॥१॥
पूर्वीं विदर्भदेशीं, नगर असे एक नाम कौण्डिन्य ।
तेथिल राजा होता, अभिधानें भीमराज जगमान्य ॥२॥
त्याची भार्या सुंदर, नाम असे चारुहासिनी व्यासा ।
कथितों कथा तयांची, सुरस असे ऐकतां रमे मनसा ॥३॥
राजा पराक्रमी तो, धर्मार्थी दानशूर बहुसाळ ।
आश्रित ब्राह्मन होते, सुविद्य सद्गुणि सुजाण तेजाळ ॥४॥
त्याला बहूत राजे, देती करभार नेमिल्या वेळीं ।
हय गज सैनिक संख्या, दशकोटी ती असे तयाजवळी ॥५॥
त्याची भार्या होती, आज्ञांकित ती पतिव्रता मोठी ।
देवद्विजांस पूजी, बहुगुण आणी सुभाग्यशी मोठी ॥६॥
सारें सौख्य असूनी, संतानाचे सुखास दंपत्य ।
मानस दुःखित होतें, अंतरलें त्या सुखास हें सत्य ॥७॥
एके दिवशीं भूपति, पत्नीला बोलिला सुतारहित ।
राज्य कशाला व्हावें, सेवूं कांतार हें असे उचित ॥८॥
ज्याला पुत्र नसे तो, त्याला स्वर्गी नसेच जागा ती ।
पुत्रावांचुन हव्या, देव तसे पितर कव्यही त्यजिती ॥९॥
उत्तम कुल हें आणिक, उत्तम गृह तें नको मला कांते ।
तैसें सु-राज्य मातें, भोगायाला उदास हें दिसतें ॥१०॥
एकंदरींत अपुला, जन्महि झाला फुका असा गेला ।
यास्तव अरण्य सेवूं, दुःखानें पत्निला असें वदला ॥११॥
ऐसें बोलुन सतिला, पाचारुन आणिलें प्रधानांस ।
प्रातःकाळीं भूपें, मनरंजन आणखी सुमंतास ॥१२॥
बुद्धीनें, नीतीनें, युक्त तसे राज्यरक्षणी निपुण ।
होते प्रधान त्याचे, रक्षाया राज्य दीधलें जाण ॥१३॥
जेव्हां परतुन येऊं, उपभोगूं राज्य आमुचें आम्ही ।
नाहिं तरी दोघांनीं, समभागा करुन भोगणें तुम्हीं ॥१४॥
(वसंततिलका)
एणेंपरी सकल ते भवपाश दूर ।
राजा करी प्रथम हे अघ-ताप दूर ॥
व्हावे म्हणून करिती वनवास व्यासा ।
पाहें सुदीन गमनास यथार्थ खासा ॥१५॥
पुण्याहवाचनविधी करि भीम आधीं ।
दानें द्विजांस दिधलीं हरणार्थ आधीं ॥
पत्नीसहित धरिला वनमार्ग त्यांनीं ।
पाहे तडाग भरलें जल अंबुजांनीं ॥१६॥
पुष्पें फलें प्रचुरशीं दिसलीं तरुंला ।
त्यांमाजि भव्य मुनिचें गृह एक त्याला ॥
पाहे अपूर्व नयनीं नृप हें विचित्र ।
मार्जार-मूषक जणूं समभाव मित्र ॥१७॥
मुंगूस सर्प समभाव धरुन एकी ।
तैसेच सिंह गज हे विसरुन बेकी ॥
राजास ती सति म्हणे अति नम्रवाचें ।
वंदूं चला चरन त्या मुनि आश्रमींचे ॥१८॥
(भुजंगप्रयात्)
अशा आश्रमीं आसनीं बैसले ते ।
ऋषी नाम विश्वायुतमित्र जे ते ॥
तयांभोंवतीं बैसला शिष्यवृंद ।
तयां वेदघोषीं असे फार छंद ॥१९॥
पदीं राज्ञि नी भूपती लीन होती ।
अशा पुण्यराशी ऋषींना नमीती ॥
तया दंपतीला दिलें आसनाला ।
वरी बैसतां भाव तो ओळखीला ॥२०॥
ऋषी त्या द्वयांना वदे मोदयुक्त ।
तुम्हां पुत्र होवो गुणी कीर्तियुक्त ॥
नृपासी मुनी वृत्त हें पूसतात ।
तुम्ही कोठुनी येतसां या स्थलांत ॥२१॥
वदे भूपती नाम वैदर्भ प्रांत ।
असें कोणतें स्थान बा सांग वृत्त ॥
तयामाजि कुंडीनपुरीं वसें मी ।
मला लोक संबोधिती भीम नामीं ॥२२॥
(मंदाक्रांता)
सूतासाठीं तप बहुत कीं दान-धर्मादि केलीं ।
यापूर्वींचें स्मरण मजला पापं हीं काय केलीं ॥
यासाठीं कीं मज फळ नसे लाधलें नाहिं आतां ।
राज्याला मीं त्यजुन वन हें सेविलें माय तातां ॥२३॥
आतां दैवें मजसि तुमचें दर्शनें लाभ पूर्ण ।
आशीर्वादें बहुत गुणिं तो पुत्र होईल तूर्ण ॥
साधूंचा हा सुखकर असा संग होईल सांग ।
संतानाचें वदन न दिसे पाप मागील सांग ॥२४॥
(गीति)
विश्वामित्र वदे त्या, भीमाला एक पूर्विंचें कथन ।
विधि व्यासासी सांगे, तीच कथा तो भृगू करी कथन ॥
संपत्तीच्या गर्वें, त्यागियले ते समस्त कुल-धर्म ।
झालास अंध भूपा, सांगतसें मी तुला गुपित वर्म ॥२६॥
वेदपुराणांमाजी, शास्त्रांमाजी तसाच लौकीकीं ।
आणिक विषयांमाजी, उत्तम ज्ञानी म्हणून लौकीकीं ॥२७॥
असलें साधूपूजन, गणपतिचें करित नित्य नियमांनीं ।
त्यांचें पूजन केलें, नाहीं म्हणुनी तुला निसंतानीं ॥२८॥
कुलदैवत हें तुमचें, गणपति असुनी करी न पूजन तें ।
यास्तव तुजवरि त्याचा, कोप असे हा मला खरें दिसतें ॥२९॥
विश्वामित्र नृपाला, सांगे वृत्तान्त तो करी श्रवण ।
ऐकावयास झाले, दोघाम्चे ते पिपासु हो श्रवण ॥३०॥
पूर्वज पिढींत भीमच, राजा तो सातवा असे पुरुष ।
त्याची भार्या कमला, प्रसवे पुत्रास ती बहु वरुषं ॥३१॥
जन्मापासुन बहिरा, तैसा कुबडा असे मुका पुत्र ।
बहु-भगयुक्तहि अंगीं, दुर्गंधीनें तसाच अपवित्र ॥३२॥
(हरिणी)
प्रभु मज अशा पुत्रासी तूं कशास दिधलें मला ।
असुत मजसी ऐसें कोणीं जरी वदलें मला ॥
अवघड मनीं नाहीं देवा कधींचहि वाटलें ।
मरण मजसी किंवा यासी दिल्यासहि चांगलें ॥३३॥
कु-सुत असला दावूं कोणा मदीय मुखास मी ।
रुदन करिते दुःखानें ती वदे असुखीच मी ॥
नृप परिसुनी आला तेथें बघे सति नी सुता ।
मधुरवचनीं झाला तीतें वदे समजावितां ॥३४॥
(मंदाक्रांता)
हे कल्लयाणी नृप सतिस हें दुःख तें सोड बोले ।
मीं तूं पूर्वीं जनित असतां कर्म जें आचरीलें ॥
त्याच्यायोगें फल मिळत असें भोगणें योग्य साचें ।
नानाशब्दें नृप सतिस हो आळवी गोड वाचें ॥३५॥
सौख्यें दुःखें टिकत नसती फार तीं काळ कांते ।
जो जो प्राणी सुख बहुत हें भोगितो जाण त्यातें ॥
होती दुःखें तदुपरि पहा साहण्या योग्य होतो ।
यासाठी तूं दृढ मन करीं आवरीं शोक जो तो ॥३६॥
(गीति)
असलें बालक आहे, म्हणुनी कांते करुं नको शोक ।
याचें संचित म्हणुनी, जन्म असे पावलें उभय लोक ॥३७॥
यास्तव दोघें करुंया, कल्लयाणाचे उपाय मंत्र-मणी ।
अथवा औषध देऊं, यात्रा तपसा करुं बरें रमणी ॥३८॥
किंवा दानें देऊं, कल्लयाणास्तव व्रतादि नियमांनीं ।
बहुविध प्रकार करुनी, सुंदर बालक दिसेल अंगांनीं ॥३९॥
मंत्र-प्रभाव मोठे, ग्रंथांमाजी लिखीत हे साचे ।
कमलेला भीम असे, संबोखित तो मधुरशा वाचें ॥४०॥