हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या

समुद्रा, डळमळु दे तारे !

विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे

ढळू दे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशूनि मातु दे दैत्य नभामधले

दडू द्या पाताळि सविता

आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला

कराया पाजळुं दे पलिता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सूड-समाधान

मिळाया प्रमत्त सैतान

जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती

करी हे तांडव थैमान !

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे

फुटू दे नभ माथ्यावरती

आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी

नाविका ना कुठली भीति !

सहकार्‍यांनो, का ही खंती जन्म खलाशांचा

झुंजण्या अखंड संग्राम

नक्षत्रापरि असीम नीलामधे संचरावे

दिशांचे आम्हाला धाम !

काय सागरी तारु लोटले परताया मागे

असे का हा अपुला बाणा

त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे, कशासाठी

जपावे पराभूत प्राणा !...

कोठ्यवधी जगतात जिवाणू जगती अन्‌ मरती

जशी ती गवताची पाती,

नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली

निर्मितो नव क्षितिजे पुढती !

मार्ग आमुचा रोधू शकती ना धन, ना दारा

घराची वा वितभर कारा

मानवतेचे निशाण मिरवू महासागरात

जिंकुनी खंड खंड सारा !

चला उबारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती

कथा या खुळ्या सागराला

"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा

किनारा तुला पामराला !"

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel