श्रीशुक उवाच-

बिभ्रद्वपुः सकलसुन्दरसन्निवेशं, कर्माचरन्भुवि सुमंगलमाप्तकामः ।

आस्थाय धाम रममाण उदारकीर्तिः, संहर्तुमैच्छत कुलं स्थितकृत्यशेषः ॥१०॥

कर्माणि पुण्यनिवहानि सुमंगलानि, गायज्जगत्कालिमलापहराणि कृत्वा ।

कालात्मना निवसता यदुदेवगेहे, पिण्डारकं समगमन्मुनयो निसृष्टाः ॥११॥

रायासी म्हणे श्रीशुकु । कर्ता करविता श्रीकृष्ण एकु ।

तो शापार्थ आत्यंतिकु । आत्मजां अविवेकु उपजवी स्वयें ॥८६॥

स्वयें जावया निजधामा । थोर आवडी पुरुषोत्तमा ।

यालागीं अवशेषकर्मा । मेघश्यामा लवलाहो ॥८७॥

केव्हां होईल कुलक्षयो । हेंचि मनीं धरी देवो ।

तो देवाचाचि भावो । शापासि पहा वो दृढ मूळ ॥८८॥

जो कुलक्षयो चिंती । त्या कृष्णाची सुंदरमूर्ति ।

शुक सांगे परीक्षितीप्रति । स्वानंदस्थिति उल्हासे ॥८९॥

सकल सौंदर्या अधिवासु । धरोनि मनोहर नटवेषु ।

लावण्यकलाविन्यासु । आणी जगदीशु निजांगें ॥२९०॥

नवल सौंदर्या बीक उठी । सर्वांगीं गुंतल्या जनदिठी ।

कृष्णस्वरुपीं पडे मिठी । होत लुलुबुटी डोळ्यां ॥९१॥

जैशी गुळीं माशीवरी माशी । तेवीं दिठीवरी दिठी कृष्णरुपासी ।

सर्वांगीं वेढोनि चौपासीं । अहर्निशीं नोसंडिती ॥९२॥

नयन लांचावले लोभा । दृष्टीसि निघालिया जिभा ।

यापरी श्रीकृष्णशोभा । स्वानंदगाभा साकार ॥९३॥

तो श्रीकृष्ण देखिला ज्या दिठीं । ते परतोनि मागुती नुठी ।

अधिकाधिक घाली मिठी । देखे सकळ सृष्टी श्रीकृष्णु ॥९४॥

ऐशी डोळ्यां आवडी । म्हणौनि कामिनी वरपडी ।

यालागीं गोपिकां गोडी । अतिगाढी गोविंदीं ॥९५॥

कृष्ण अतिसुंदर मनोरम । म्हणाल असेल त्यासि विषयधर्म ।

तरी तो अवाप्तसकळकाम । आत्माराम श्रीकृष्ण ॥९६॥

कृष्ण अवाप्तसकळकाम । त्यासि कां द्वारका गृहाश्रम ।

स्त्रिया पुत्र राज्यसंभ्रम । विषयकाम कां भोगी ॥९७॥

चहूं आश्रमां प्रकाशकु । त्रिलोकीं कृष्ण गृहस्थ एकु ।

तोचि ब्रह्मचारी नैष्ठिकु । अतिनेटकु संन्यासी ॥९८॥

कृष्णदेहीं नाहीं दैवबळ । लीलाविग्रही चित्कल्लोळ ।

त्याचीं सर्व कर्में पावनशीळ । उद्धरी सकळ श्रवणें कथनें ॥९९॥

कृष्णकर्मांचें करी जो स्मरण । तें कर्म तोडी कर्मबंधन ।

ऐसें उदार कर्माचरण । आचरला श्रीकृष्ण दीनोद्धरणा ॥३००॥

श्रीकृष्ण असेल सकाम । म्हणाल यालागीं आचरे कर्म ।

ज्याचें नाम निर्दळी सर्व काम । तो स्वयें सकाम घडे केवीं ॥१॥

श्रीकृष्णाचा स्मरतां काम । स्वयें संन्यासी होती निष्काम ।

सकामाचा निर्दळे काम । ऐसें उदार कर्म आचरला ॥२॥

तेणें अवाप्तसकळकामें । ऐशीं आचरला अगाध कर्में ।

मानव तारावया मनोधर्में । कीर्ति मेघश्यामें विस्तारिली ॥३॥

कैसें कर्म सुमंगळु । कानीं पडतांचि अळुमाळु ।

नासोनियां कर्ममळु । जाती तात्काळु श्रवणादरें ॥४॥

श्रवणें उपजे सद्भावो । सद्भावें प्रकटे देवो ।

तेणें निर्दळे अहंभावो । ऐशी उदार पहा वो हरिकीर्ति ॥५॥

श्रीकृष्णकीर्तीचें स्मरण । कां करितां श्रवणपठण ।

मागें उद्धरले बहुसाल जन । पुढें भविष्यमाण उद्धरती ॥६॥

जरी केलिया होती पुण्यराशी । तरी अवधान होये हरिकथेसी ।

येर्‍हवीं ऐकतां येरांसी । लागे अनायासीं अतिनिद्रा ॥७॥

जे हरिकथेसी सादर । त्यांच्या पुण्या नाहीं पार ।

कृष्णें सुगमोपाव केला थोर । दीनोद्धार हरिकीर्तनें ॥८॥

कृष्णकीर्तनें गर्जतां गोठी । लाजिल्या प्रायश्चित्तांचिया कोटी ।

उतरल्या तीर्थांचिया उटी । नामासाठीं निजमोक्षु ॥९॥;

ऐसा निजकीर्तिउदारु । पूर्णब्रह्म सारंगधरु ।

लीलाविग्रही सर्वेश्वरु । पूर्णावतारु यदुवंशीं ॥३१०॥

उतरला धराभार येथ । सत्य न मनी श्रीकृष्णनाथ ।

यादव उरले अतिअद्भुत । तेही समस्त निर्दळावे ॥११॥

ये अवतारीं हृषीकेशी । म्हणे हेंच कृत्य उरलें आम्हांसी ।

निर्दळोनि निजवंशासी । निजधामासी निघावें ॥१२॥;

तो यादवांमाजीं माधव । कालात्मा देवाधिदेव ।

जाणोनि भविष्याचा भाव । काय अपूर्व करिता झाला ॥१३॥

नारदादि मुनिगण । त्यांसि पाचारुनि आपण ।

करुं सांगे शीघ्र गमन । स्वयें श्रीकृष्ण साक्षेपें ॥१४॥

ज्यांपासूनि संत दूरी गेले । तेथें अनर्थाचें केलें चाले ।

हें यादवनिधनालागीं वहिलें । लाघव केलें श्रीकृष्णें ॥१५॥

भक्त संत साधु ज्यापासीं । तेथें रिघु नाहीं अनर्थासी ।

जाणे हें स्वयें हृषीकेशी । येरां कोणासी कळेना ॥१६॥

जेथें संतांचा समुदावो । तेथें जन्ममरणां अभावो ।

हा श्रीकृष्णचि जाणे भावो । तो करी उपावो ब्रह्मशापार्थ ॥१७॥

जेथूनि संत गेले दुरी । तेथें सद्यचि अनर्थु वाजे शिरीं ।

हें जाणोनियां श्रीहरी । द्वारकेबाहेरी ऋषि घाली ॥१८॥

ऋषि जात होते स्वाश्रमासी । त्यांतें लाघवी हृषीकेशी ।

तीर्थमिषें समस्तांसी । पिंडारकासी स्वयें धाडी ॥१९॥

पिंडारका मुनिगण । श्रीकृष्णें धाडिले कोण कोण ।

ज्यांचें करितांचि स्मरण । कळिकाळ आपण भयें कांपे ॥३२०॥;

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel