न यस्य स्वः पर इति वित्तेष्वात्मनि वा भिदा ।

सर्वभूतसमः शान्तः स वै भागवतोत्तमः ॥५२॥

अद्वैतभजनाचे वोजें । मी माझें तूं आणि तुझें ।

ज्यासी नुरेचि सहज निजें । तो भक्त मानिजे उत्तमत्वें ॥३६॥

यापरी ज्याचे चित्ताचे ठायीं । भेदु निःशेष उरला नाहीं ।

तेथ माझें तुझे हें कांहीं । तें निमालें पाहीं जेथींच्या तेथें ॥३७॥

जेवीं अग्नीशीं जें जें टेंके । तें तें अग्नीचि होऊनि ठाके ।

तेवीं अभेदभक्त जें जें देखे । तें तें यथासुखें स्वस्वरुप होये ॥३८॥

निजवित्त आणिकापाशीं देतां । आवांकू नुपजे त्याचिया चित्ता ।

न देखे पारकेपणाची वार्ता । विकल्प घालितां तरी उपजेना ॥३९॥

डावे हातींचे पदार्था । उजवे हातीं स्वयें देतां ।

येथें कोण देता कोण घेता । तेवीं एकात्मता सर्वभूतीं ॥७४०॥

आपणासकट सर्व देहीं । भक्तां भगवंतावांचूनि नाहीं ।

यालागीं शांति त्याचे ठायीं । स्वानंदें पाहीं निःशंक नांदे ॥४१॥

ऐशिया निजसमशांतीं । भगवद्भक्त क्रीडा करिती ।

यालागीं उत्तमत्वाची प्राप्ती । सुनिश्चितीं पावले ॥४२॥;

हरिभक्तांची ’निरपेक्षता’ । ऐक सांगेन नृपनाथा ।

उत्तम भक्तांची सांगतां कथा । अतिउल्हासता हरीसी ॥४३॥

निरपेक्ष तो मुख्य ’भक्त’ । निरपेक्ष तो अति ’विरक्त’ ।

निरपेक्ष तो ’नित्यमुक्त’ । सत्य भगवंत निरपेक्षी ॥४४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel