ततो विराजमुत्सृज्ज वैराजः पुरुषो नृप ।

अव्यक्तं विशते सूक्ष्मं निरिन्धन इवानलः ॥१२॥

प्रळयकालीं अतिगहिंसु । अगाध उसळे जळोल्हासु ।

स्थूळाचा करितां नाशु । विरे निःशेषु विराटु ॥७४॥

विराटाचा वैराज पुरुषु । तो अव्यक्तीं करी प्रवेशु ।

जेवीं इंधननाशें हुताशु । करी रहिवासु निजकारणीं ॥७५॥

जे ब्रह्मलोकनिवासी होती । त्यांसी महाप्रळयाचे अंतीं ।

ब्रह्मासवें सर्वांसी ’क्रममुक्ती’ । ऐसें स्मृति-श्रुतींचें दृढ वाक्य ॥७६॥

’वैराजपुरुष’ नाम वदंती । हिरण्यगर्भातें म्हणती ।

त्यासी प्रळयीं प्रवेशु अव्यक्तीं । तैं इतरांची गति श्रुतिवाक्यें कैसी ॥७७॥;

विदेहें पुशिली मायेची स्थिती । ते मायेची ऐशी दुर्धर शक्ती ।

जे न करिती भगवद्भक्ती । त्यां ब्रह्मयासवें मुक्ती घडों नेदी ॥७८॥

जालिया ब्रह्मसदनप्राप्ती । न करितां भगवद्भक्ती ।

अतिशयें दुर्लभ मुक्ती । भक्तीपाशीं मुक्ती दासी जैसी ॥७९॥

न करितां भगवद्भजन । ब्रह्मयासीही मुक्ति नव्हे जाण ।

मा इतरांचा ज्ञानाभिमान । पुसे कोण परमार्थीं ॥१८०॥

ज्यासी जेथ पदाभिमान । त्यासी तेंचि दृढ बंधन ।

यालागीं दुर्लभपण । मोक्षासी जाण तिहीं लोकीं ॥८१॥

सांडोनियां पदाभिमान । अंगें सदाशिवु आपण ।

नित्य वसवी महाश्मशान । भगवद्भजनीं निजनिष्ठा ॥८२॥

यालागीं ज्यांसी ब्रह्मलोकपदप्राप्ती । तेथही जे करिती भगवद्भक्ती ।

त्यांसीच प्रळयाच्या अंतीं । परममुक्ती नृपवर्या ॥८३॥

ब्रह्मलोकीं ज्यां नाहीं हरिभक्ती । तेही पावती पुनरावृत्ती ।

ऐशी मायेची दुर्धर शक्ती । न करितां भक्ती, मुक्ति कैंची ॥८४॥

येचि अर्थीं ब्रहयाचें वचन । दों श्लोकीं बोलिला आपण ।

ज्ञानाभिमानियां पतन । भक्तां भवबंधन कदा न बाधी ॥८५॥

(ब्रह्मादिकृतगर्भस्तुतिश्लोकौ)

येऽन्यऽरविन्दाक्ष विमुक्तमानिनस्त्वय्यस्तभावादविशुद्धबुद्धयः ।

आरुह्य कृच्छ्रेण परं पदं ततः पतन्त्यधोऽनादृतयुष्मदङ्‌घ्रयः ॥१॥

तथा न ते माधव तावकाः कवचिद्‌भ्रश्यन्ति मार्गत्त्वयि बद्धसौहृदाः ।

त्वयाभिगुप्ता विचरन्ति निर्भया विनायकानीकपमूर्धसु प्रभु ॥२॥

- (भागवत, द. स्कं.पूर्वार्धं, अ.२

न करितां भगवद्भक्ती । सज्ञानाही नातुडे मुक्ती ।

तेचि अर्थीच्या दृष्टांतीं । ब्रह्मयाची उक्ती दाविली येथें ॥८६॥

जन्मामाजीं ब्राह्मणपण । तेही वेदशास्त्रसंपन्न ।

न करितां भगवद्भजन । अचूक पतन तयांसी ॥८७॥

भक्तां सर्वभूतीं भगवद्भावो । तेथ विघ्नांसी नाहीं ठावो ।

तयां अपावचि होय उपावो । भावार्थ देवो सदा साह्य ॥८८॥

भक्तीवीण मुक्तीचा सोसु । करितां प्रयत्‍न पडे वोसु ।

असो हें वैराजपुरुषु । करी प्रवेशु अव्यक्तीं ॥८९॥

अव्यक्तीं वैराजाचा प्रवेशु । होतांचि महाभूतविलासु ।

हों लागे भूतां र्‍हासु । तो अनुप्रवेशु ऐक राया ॥१९०॥;

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel