आत्मानं तन्मयं ध्यायन् मूर्तिं संपूजयेद्धरेः ।

शेषामाधाय शिरसि स्वधाम्न्युद्वास्य सत्कृतम् ॥५४॥

द्वैतभावें भजनविधि । ते जाणावी स्थूल बुद्धि ।

भजनाची भजनसिद्धी । जाण त्रिशुद्धी तन्मय होणें ॥८४०॥

मूर्तिध्यानें तन्मय स्थिति । ऐक्यत्वें राहे निश्चळ वृत्ति ।

याचि नांव मुख्य भक्ति । उठलिया पुढती नमावें हरी ॥८४१॥

ऐशी पूजा करुननि । हरी शेष प्रसादु धरोनि शिरीं ।

मग देवो आपणियाभीतरीं । हृदयमंदिरीं निजविजे ॥८४२॥

एवं पूजेचें उद्वासन । ध्यानमूर्ति हृदयीं शयन ।

प्रतिमा पर्यंकीं निजवून । विधिविधानसमाप्ति ॥८४३॥

जाहलिया पूजाविसर्जन । विसर्जूं नये अनुसंधान ।

अखंड हरीचें स्मरण । सर्वस्वें आपण सर्वदा कीजे ॥८४४॥

या नांव गा आगमविधि । राया जाण त्रिशुद्धि ।

सदा पाळिती सद्‍बुद्धि । परमात्मसिद्धिप्रापक ॥८४५॥

आगमोक्त विधिलक्षण । प्रतिमाचि मुख्य नव्हे जाण ।

ज्यासी जेथ श्रद्धा पूर्ण । तेथ हें विधान सुखें कीजे ॥८४६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel