कलिं सभाजयन्त्यार्या गुणज्ञाः सारभागिनः ।

यत्र संकीर्तनेनैव, सर्वः स्वार्थोऽभिलभ्यते ॥३६॥

अवधारीं राया सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा ।

जेथ सर्व स्वार्थ हरिकीर्तना । नामस्मरणासाठीं होती ॥३॥

कलियुगीं दोष बहुत । केवीं कीर्तनें होय स्वार्थ ।

तेथें दोषत्यागें जे गुण घेत । ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥४॥

हरिकीर्तनें शुद्ध चित्त । दोषत्यागें गुण संग्रहीत ।

ऐसे सारभागी कलियुगांत । परममुक्त हरिकीर्तने ॥५॥

कलीच्या गुणांतें जाणते । नामें मोक्ष जोडणें येथें ।

जाणोनि करिती कीर्तनातें । ते जाण निश्र्चितें नित्यमुक्त ॥६॥

कलियुगीं हेंचि सार । नाम स्मरावें निरंतर ।

करिती नामाचा निजगजर । ते मुक्त नर नृपनाथा ॥७॥

(संमत श्र्लोक) ध्यायन्कृते यजन्यज्ञैस्त्रेतायां द्वापरेऽर्चयन् ।

यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम् ॥

कृतयुगीं शमदमादिसाधन । त्रेतायुगीं वेदोक्त यज्ञ ।

द्वापरीं आगमोक्त पूजन । तंत्रविधान विधियुक्त ॥८॥

यापरी त्रियुगीं जना । परम संकट साधना ।

करितांही परी मना । अणुमात्र जाणा उपरमु नव्हे ॥९॥

तीं अवघींच साधनें । कलीनें लाजविलीं कीर्तनें ।

जेथ गातां नाचतां आपणें । वश्य करणें परमात्मा ॥४१०॥

आखरीं हुंबळी गुणें । ऐकतां गोवळांचें गाणें ।

देव भुलला जीवेंप्राणें । त्यांसवें नाचणें स्वानंदें ॥११॥

कृष्णा कान्हो गोपाळा । या आरुष नामांचा चाळा ।

घेऊन गर्जती वेळोवेळां । तेणें घनसांवळा सुखावे ॥१२॥

तेणें सुखाचेनि संतोषें । देवो परमानंदें उल्हासे ।

एवं कलियुगीं कीर्तनवशें । भक्त अनायासें उद्धरती ॥१३॥

कीर्तन‍आवर्तनमेळीं । जळती पापांच्या वडवाळी ।

भक्त उद्धरती तत्काळीं । हरिनामें कलि दाटुगा ॥१४॥

कलियुगीं हेचि थोरी । नामसंकीर्तनावारी ।

चहूं वर्णां मुक्त करी । तेथ न विचारी स्त्री शूद्र ॥१५॥

वेदु अत्यंत कृपणु जाला । त्रिवर्णांचे कानीं लागला ।

स्त्रीशूद्रादिकांसी अबोला । धरूनि ठेला अद्यापि ॥१६॥

तें वेदाचें अतिन्यून । उद्धरीं हरिनामकीर्तन ।

स्त्री शूद्र अंत्यज जन । उद्धरण हरिनामें ॥१७॥

कीर्तनें स्वधर्मु वाढे । कीर्तनें स्वधर्मु जोडे ।

कीर्तनें परब्रह्म आतुडे । मुक्ति कीर्तनापुढें लाजोनि जाय ॥१८॥

कीर्तनानंदें चारी मुक्ति । हरिभक्तांतें वरूं येती ।

भक्त त्यांतें उपेक्षिती । तरी पायां लागती दास्यत्वें ॥१९॥

एवढी कलियुगीं प्रचीती । कीर्तनाची परम ख्याती ।

राया जाण गा निश्र्चितीं । विकल्प चित्तीं झणें धरिसी ॥४२०॥

कृतत्रेताद्वापारासी । निषेधु नाहीं नामासी ।

कलियुगीं नामापाशीं । चारी मुक्ती दासी स्वयें होती ॥२१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
yashawant hire

फारच छान आहे

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीएकनाथी भागवत


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
 भवानी तलवारीचे रहस्य
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी