सृष्ट्वा पुराणि विविधान्यजयाऽऽत्मशक्त्या वृक्षान् सरीसृपपशून् खगदंशमत्स्यान् ।

तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय ब्रह्मावलोकधिषणं मुदमाप देवः ॥२८॥

हेचि जाणावया निजरूपातें । पूर्वीं तेणें श्रीअनंतें ।

निजमायेचेनि हातें । केलीं बहुतें शरीरें ॥२१॥

एकें केलीं भूचरें । एकें तें केलीं खेचरें ।

एकें केली जळचरें । चरें अचरें तीं एकें ॥२२॥

वृक्ष सर्प पशु दंश । राक्षस पिशाच बक हंस ।

मत्स्यकच्छादि अशेष । सृजी बहुवस योनींतें ॥२३॥

ऐसा चौर्‍यांशीं लक्ष योनी । सृजूनि पाहे परतोनी ।

तंव निजप्राप्तीलागोनी । न देखे कोणी अधिकारी ॥२४॥

ऐशिये देखोनि सृष्टीतें । सुख न वाटेचि देवातें ।

मग मानवी प्रकृतीतें । आदरें बहुतें निर्मिलें ॥२५॥

बाहुल्यें मनुष्यदेहीं । निजज्ञान घातलें पाहीं ।

जेणें ज्ञानें देहीं । विदेह पाहीं पावती ॥२६॥

आहार निद्रा भय मैथुन । सर्वा योनींसी समसमान ।

मनुष्यदेहींचें ज्ञान । अधिक जाण सर्वांशीं ॥२७॥

देखोनि मनुष्यदेहासी । सुख झालें भगवंतासी ।

अधिकार ब्रह्मज्ञानासी । येणें देहेंसीं मत्प्राप्ती ॥२८॥

पावोनियां मनुष्यपणा । जो न साधी ब्रह्मज्ञाना ।

तो दाढीचा मेंढा जाणा । विषयाचरणा विचरतू ॥२९॥

मनुष्यदेहींचेनि ज्ञानें । सच्चिदानंदपदवी घेणें ।

एवढा अधिकार नारायणें । कृपावलोकनें दीधला ॥३३०॥

मनुष्यदेहीं ब्रह्मज्ञान । पुढील जन्मीं मी करीन ।

म्हणे तो नागवला जाण । सोलींव अज्ञान त्यापासीं ॥३१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel