द्वितीयं प्राप्यानुपूर्व्याज्जन्मोपनयनं द्विजः ।

वसन्गुरुकुले दान्तो ब्रह्माधीयीत चाहुतः ॥२२॥

मेखलाऽजिनदण्डाक्ष ब्रह्मसूत्र कमण्डलून् ।

जटिलोऽधौतदद्वासोऽरक्तपीठः कुशान् द्‍धत् ॥२३॥

स्नानभोजनहोमेषु जपोच्चारे च वाग्यतः ।

न च्छिंद्यान्नखरोमाणि कक्षोपस्थगतान्यपि ॥२४॥

गर्भाधान पुंसवन । जातकर्म अन्नप्राशन ।

हीं समस्त कर्में पूर्वीं जाण । केलीं संपूर्ण चौलान्त ॥७१॥

याउपरी उपनयन । गुरुद्वारा गायत्रीग्रहण ।

सावित्रजन्म हें संपूर्ण । `व्रतबंध' जाण या नांव ॥७२॥

एवं गायत्रीमंत्रें जाण । द्विजन्मे होती तीनी वर्ण ।

हा ब्रह्मचर्याश्रम संपूर्ण । व्रतधारण वेदार्थ ॥७३॥

तेथ वेदाध्ययन निर्धारीं । गुरुगृहीं वसे ब्रह्मचारी ।

त्याच्या व्रतनेमाची कुसरी । ऐक ते परी सांगेन ॥७४॥

मुंजी जानवें कृष्णाजिन । पळसाचें दंडग्रहण ।

कमंडलु वागवावा जाण । जळाचरण करावया ॥७५॥

न करावें मस्तकवपन । न करावें तैलाभ्यंगस्नान ।

न करावें दंतधावन । केशविंचरण न करावें ॥७६॥

न करावें नखनिकृंतन । न करावें रोमच्छेदन ।

बाहुमूलादिक जे जाण । गुह्य स्थान अतिव्याप्त ॥७७॥

रजकक्षाळित वस्त्रें जाण । त्याचें न करावें परिधन ।

प्रवाहीं करावें स्नान । प्रातर्मध्यान्ह दोंही काळीं ॥७८॥

आसनीं श्वेत पीठासन । श्वेत वस्त्रांचें धारण ।

रुद्राक्ष अथवा पद्मक्ष जाण । मालाग्रहण जपार्थ ॥७९॥

कुशादि दर्भ पवित्र । तिहीं युक्त असावे कर ।

ऐक मौनाचा विचार । तुज मी साचार सांगेन ॥२८०॥

मळमूत्र कां करितां स्नान । जप होम आणि भोजन ।

उभय संध्याकाळीं जाण । निश्चित मौन धरावें ॥८१॥

नाहीं अभ्यंग केशविंचरण । तेणें जटा वळल्या आपण ।

हें ब्रह्मचारियासी जाण । व्रतधारण नेमस्त ॥८२॥

इतुकेनि व्रतेंसीं जाण । सदा गुरुसेवेसी सावधान ।

गुरु कृपेनें सांगे अध्ययन । तेव्हां वेदपठन करावें ॥८३॥

मज पढों सांगावें आतां । हा आग्रह न करावा गुरुनाथा ।

त्याची आज्ञा वंदूनि माथां । निष्कपटता गुरुसेवा ॥८४॥

अध्ययन सांगेना लवलाह्या । तरी सांडूनि कुलाचार्या ।

पढों गेलिया आणिका ठाया । गुरु त्यागिलिया महादोष ॥८५॥

सेवा करावी अहर्निशीं । जेणें कृपा उपजे स्वामीसी ।

ते कृपेस्तव अध्ययनासी । अहर्निशीं सांगेल ॥८६॥

ठेवूनि गुरुचरणीं भावार्था । पढावें गा वेदशास्त्रार्था ।

आकळावें वेदतत्त्वार्था । परमार्थतां निजबुद्धी ॥८७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel