श्रीभगवानुवाच-

अहिंसा सत्यमस्तेयमसङ्गो ह्रीरसञ्चयः ।

आस्तिक्यं ब्रह्मचर्यं च मौनं स्थैर्यं क्षमाभयम् ॥३३॥

प्रथम श्लोकींचा उभारा । यमाचीं लक्षणें बारा ।

पुशिल्या प्रश्नानुसारा । प्रतिउत्तरा हरि बोले ॥७७॥

पुढां प्रश्न आहेत फार । यालागीं यमनियमांचें उत्तर ।

आवरूनि संक्षेपाकार । स्वयें श्रीधर सांगत ॥७८॥

`अहिंसा' कायावाचामनें । परपीडात्याग करणें ।

`सत्य' यें यथार्थ बोलणें । `अचौर्य' लक्षणें तीं ऐक ॥७९॥

हातें चोरी नाहीं करणें । परी परद्रव्याकारणें ।

मनीं अभिलाष नाहीं धरणें । `अस्तेय' लक्षण त्या नांव ॥३८०॥

असतां देहगेहसंगती । ज्याचे पोटीं नाहीं आसक्ती ।

जेवीं यात्रेमाजीं लोक येती । परी संगासक्ती त्यां नाहीं ॥८१॥

स्फटिक ठेविला ज्या रंगावरी । त्यासारिखा दिसे बाहेरी ।

आपण निर्विकार अंतरीं । तेवीं जो शरीरीं `असंगता' ते ॥८२॥

निंद्य कर्माकारणें । पोटांतूनि कंटाळणें ।

लौकिकीं निंद्य कर्मा लाजणें । `ह्रीं' म्हणणें या नांव ॥८३॥

इहलोकीं संग्रह करूं नेणें । जाणे दैवाधीन देहाचे जिणें ।

स्वर्गसुख भोगाकारणें । नाहीं संग्रहणें पुण्यातें ॥८४॥

पुण्यें स्वर्गभोगप्राप्ती । पुण्यक्षयें होय पुनरावृत्ती ।

जेणें क्षयो पावे पुण्यसंपत्ती । तें न संचिती निजभक्त ॥८५॥

या नांव गा 'असंचयो' । ऐक 'आस्तिक्याचा' निर्वाहो ।

सर्वत्र माझा ब्रह्मभावो । कोठेंही अभावो घेऊं नेणें ॥८६॥

`ब्रह्मचर्य' ऐसें येथ । जैसे आश्रमप्रयुक्त ।

बोलिलें शास्त्रीं यथोचित । तेंचि निश्चित करावें ॥८७॥

`मौनिं' न बोलावें इतुकें जाण । मिथ्यालाप असंभाषण ।

नित्य करावें वेदपठण । गायत्रीस्मरण कां हरिनाम ॥८८॥

स्तिरवृत्ति आत्मारामीं । कां असावी निजधर्मीं ।

भावार्थें संतसमागमीं । `स्थिरता' उपक्रमीं या नांव ॥८९॥

स्वदेह दंडिलें कां वंदिलें । परी क्षमा सम दोंही काळें ।

देहाचा भोग तो दैवमेळें । येणें विवेकमेळें क्षमावंत ॥३९०॥

या नांव `क्षमा' म्हणिजे । अभय तें ऐसें जाणिजे ।

जें जें पारिखें देखिजे । तें तें होइजे आपणचि ॥९१॥

आत्मा एक पंचभूतें एक । दुजें पाहतां नाहीं देख ।

निमालें भयाचें महादुःख । `अभय' निःशेख या नांव ॥९२॥

निमाल्या दुजयाच्या गोठी । वोखदासी भय न मिळे सृष्टीं ।

अभयाची स्वानंदपुष्टी । निजदृष्टीं ठसावें ॥९३॥

या नांव गा बाराही `यम' । उद्धवा सांगितले सवर्म ।

आतां जयाचें नाम `नेम' । तेंही सुगम अवधारीं ॥९४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel