परस्परानुप्रवेशात्तत्त्वानां पुरुषर्षभ ।

पौर्वापर्यप्रसंख्यानं, यथा वक्तुर्विवक्षितम् ॥७॥

गुरुपाशीं शास्त्रपाठा । करुनि साधिली निजनिष्ठा ।

ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । प्रियवरिष्ठा प्रियोत्तमा ॥७२॥

तत्त्वगणनेचे जे जे लेख । एकाचें थोडें एकाचें अधिक ।

हा ’अनुप्रवेश’ वोळख । एकामाजीं एक उपजती ॥७३॥

तत्त्वांपासूनि तत्त्वें होतीं । कारणरुपें कार्याची स्थिती ।

अंतीं जेथील तेथें प्रवेशती । हे तत्त्वोपपत्ती उद्धवा ॥७४॥

पूर्वस्थिति जें तें कारण । त्यापासोनि उपजे तें कार्य जाण ।

हें कार्यकारणांचें लक्षण । तत्त्वविचक्षण बोलती ॥७५॥

येथ वक्‍त्याचें जैसें मनोगत । तैशी तत्त्वसंख्या होत ।

कार्य-कारण एकत्व गणित । तत्त्वसंख्या तेथ थोडीच ॥७६॥

एकचि कार्य आणि कारण । गणितां आणिती भिन्न भिन्न ।

तेथ तत्त्वसंख्या अधिक जाण । होय गणन उद्धवा ॥७७॥

एवं कार्यकारणें भिन्नभिन्नें । तत्त्वसंख्या थोडी बहुत होणें ।

हीं तत्त्ववक्‍त्यांचीं लक्षणें । तुज सुलक्षणें सांगितलीं ॥७८॥

येचि विषयींची उपपत्ती । स्वयें सांगताहे श्रीपती ।

कार्यकारणनिजयुक्ती । उद्धवाप्रती निवाडे ॥७९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel