सत्त्वसङगादृषीन् देवान् रजसा सुरमानुषान् ।
तमसा भूततिर्यक्त्वं भ्रामितो याति कर्मभिः ॥५१॥
देहाभिमानाचिये स्थिती । त्रिगुण गुणांचीं कर्में होती ।
तेणें त्रिविध संसारप्राप्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥९६॥
न करितां कृष्णार्पण । सात्त्विक कर्म कीजे आपण ।
तेणें क्षोभें सत्त्वगुण । उत्तम देह जाण उपजवी ॥९७॥
सत्त्वाच्या अतिउत्कर्षगतीं । देवऋषि ब्रह्मऋषि होती ।
सत्त्वाच्या समसाम्यस्थितीं । कल्पायु जन्मती आजानुबाहो ॥९८॥
सत्त्वगुणें क्रियायुक्त । स्वर्गीं देव होती स्वर्गस्थ ।
भोगक्षयें अधःपात । या योनीं जनित सत्त्वगुणें ॥९९॥
आश्रयूनि राजस गुण । करितां राजस कर्माचरण ।
तेणें क्षोभला रजोगुण । योनि कोण उपजवी ॥६००॥
राजस कर्म ब्रह्मीं अर्पिती । ते दैत्यही भगवद्भक्त होती ।
जे रजउत्कर्षें भोग वांछिती । ते असुर होती महायोद्धे ॥१॥
रजोगुणें स्वकर्माचरण । तेणें कर्में जन्मती ब्राह्मण ।
रजतारतम्यें जाण । चारी वर्ण जन्मती ॥२॥
तामसाचे संगतीं जाण । करितां तमिष्ठ कर्माचरण ।
तेणें क्षोभला जो तमोगुण । तो नीच योनी दारुण उपजवी ॥३॥
भूत प्रेत पिशाचक । तिर्यग्योनि असंख्य ।
वृक्ष पर्वत पाषाण देख । या योनी अनेक भोगवी ॥४॥;
आशंका ॥ कर्म त्रिगुणात्मक साचार । परी कर्मफळभोक्ता ईश्वर ।
हा वेदशास्त्रें विचार । केला निर्धार तुम्हींही ॥५॥
देहसाक्षित्वें आत्मा निराळा । ऐसा गतश्लोकीं केला निर्वाळा ।
जैं कर्मफळभोक्ता कर्मावेगळा । तैं कर्मफळा केवीं भोगी ॥६॥
ऐसें आशंकेचें अंतर । जाणोनियां शाङर्गधर ।
तोचि अथाचें उत्तर । विशद साचार सांगत ॥७॥