सात्त्विकः कारकोऽसङगी रागान्धो राजसः स्मृतः ।
तामसः स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रयः ॥२६॥
कांटेनि कांटा फेडितां । जेवीं निवारे निजव्यथा ।
तेवीं संगें संगातें छेदितां । सात्विक कर्ता असंगी ॥४६॥
सदुचरणसत्संगें । सकळ संग छेदी विरागें।
सात्विक कर्ता निजांगें । विषयसंगें असंगी ॥४७॥
फळाभिलाषेच्या चित्तीं गांठी । तेणें अंध झाली विवेकदृष्टी ।
राजस कर्ता फळाशेसाठीं । अतिदुःखकोटी स्वयें सोशी ॥४८॥
निःशेष हारपे विवेकज्ञान । स्मृति सैरा वळघे रान ।
नाठवे कार्य कारण । ऐसा कर्ता जाण तामस ॥४९॥
अनन्य भावें हरीसी शरण । कर्मचाळक श्रीनारायण ।
कदा न धरी कर्माभिमान । हा कर्ता निर्गुण निश्चयें ॥३५०॥
त्रिगुणांची श्रद्धा त्रिविध । निर्गुणाची श्रद्धा शुद्ध ।
येच अर्थीचें विशद । स्वयें गोविंद सांगत ॥५१॥;
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.