विधिना विहिते कुण्डे, मेखलागर्तवेदिभिः ।

अग्निमाधाय परितः, समूहेत्पाणिनोदितम् ॥३६॥

परिस्तीर्याथ पर्युक्षेदन्वाधाय यथाविधि ।

प्रोक्षण्यासाद्य द्रव्याणि, प्रोक्ष्याग्नौ भावयेत माम् ॥३७॥

आगमोक्त कुंडविधान । लांबी रुंदी खोली कोण ।

गणूनि उंचीचें प्रमाण । कुंड संपूर्ण साधावें ॥५॥

स्वशाखा जें वेदप्रोक्त । मेखळायुक्त साधावी गर्त ।

योनीसकट वेदी तेथ । लक्षणोक्त साधावी ॥६॥

तेथ करुनि अग्न्याधान । प्रतिष्ठिला जो हुताशन ।

त्यासी करुनि करस्पर्शन । परिसमूहन करावें ॥७॥

दर्भीं करावें परिस्तरण । मग करावें पर्युक्षण ।

इध्माबर्हिविसर्जन । त्रिसंधान ठेवावें ॥८॥

करुनि बर्हीचें आस्तरण । करावें आज्यस्थालीस्थापन ।

व्याहृतीं समिधाहोम जाण । ’अन्वाधान’ त्या नांव ॥९॥

प्रोक्षणीपात्रींचें विधान । करुनि भरावें जळ पूर्ण ।

तेणें कुशाग्रजळें आपण । होमद्रव्यें जाण प्रोक्षावीं ॥३१०॥

कुंडीं प्रदीप्त हुताशन । तेथ करावें माझें ध्यान ।

तें ध्यानमूर्तीचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥११॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel