देहेन्द्रियप्राणमनोऽभिमानो, जीवान्तरात्मा गुणकर्ममूर्तिः ।

सूत्रं महानित्युरुधेव गीतः ,संसार आधावति कालतन्त्रः ॥१६॥

अनंत अपार ज्ञानघन । मायातीत आत्मा पूर्ण ।

तोचि झाला मायेचें अधिष्ठान । ’अंतरात्मा’ जाण यालागीं म्हणिपे ॥९३॥

माया व्यापूनि अपार । यालागीं बोलिजे ’परमेश्वर’ ।

मायानियंता साचार । यालागीं ’ईश्वर’ म्हणिपे तो ॥९४॥

तोचि अविद्येमाजीं प्रतिबिंबला । यालागीं ’जीव’ हें नाम पावला ।

तोचि देहाध्यासें प्रबळला । ’अहंकार’ झाला या हेतू ॥९५॥

तो संकल्पविकल्पउपाधीनें । स्वयें होऊनि ठेला ’मन’ ।

त्या मनासी करावया गमन । ’दशेंद्रियें’ जाण तोचि झाला ॥९६॥

त्या इंद्रियांचा आधार । सुखदुःखभोगांचा निकर ।

पापपुण्याचा चमत्कार । ’देहाचा आकार’ तोचि झाला ॥९७॥

त्या देहाचें जें कारण । ’सत्व-रज- तमोगुण ’ ।

ते तीन्ही गुण जाण । तोचि आपण स्वयें झाला ॥९८॥

गुणक्षोभाचें निजवर्म। झाला ’पंचविषय’ परम ।

विषयभोगादि क्रिया कर्म । स्वयें ’स्वधर्म’ होऊनि ठेला ॥९९॥

तिनी गुणांचें जन्मकारण । झाला ’महत्तत्त्व-सूत्रप्रधान’ ।

एवं संसार अवघा जाण । ईश्वर आपण स्वयें झाला ॥२००॥

त्या संसाराची आधावती । गुणसाम्यें तोचि ’प्रकृती’ ।

तेथ उत्पत्तिस्थिति-प्रळयार्थी । क्षोभिकाशक्ति ’काळ’ तो झाला ॥१॥

तो काळ आपल्या सत्ताशक्तीं । उपजवी पाळी संहारी अंतीं ।

ऐशा पुनःपुनः आवृत्ती । नेणों किती करवीत ॥२॥

एवं संसार तो ब्रह्मस्फुर्ती । लीलाविग्रहें साकारस्थिती ।

मी विश्वेश्वर विश्वमूर्ती । बहुधा व्यक्ती मी एक ॥३॥

यालागीं जो जो पदार्थ दिसे । तेणें तेणें रुपें आत्मा भासे ।

मजवेगळा पदार्थ नसे । हें मानी विश्वासें तो धन्य ॥४॥

मीचि एक बहुधा व्यक्ती । वेदही साक्षी येचि अर्थी ।

’विश्वतश्चक्षु ’ या वेदोक्तीं । श्रुति मज गाती सर्वदा ॥५॥

ऐसें असतां नवल कैसें । जीव भुलला कल्पनावशें ।

अहंता वाढवी देहाध्यासें । तो म्हणे देव न दिसे तिहीं लोकीं ॥६॥

सत्य मानूनि भेदभान । जीव झाला अतिअज्ञान ।

भुलला आपण्या आपण । देहाभिमान दृढ झाला ॥७॥

देहाभिमानाचें दृढपण । तेंचि ’बद्धतेचें लक्षण’ ।

देहाभिमानाचें निरसन । ’मुक्तता’ जाण ती नांव ॥८॥

समूळ मिथ्या देहाभिमान । मिथ्या भेदाचें भवभान ।

त्याचें आद्यंत निर्दळण । होतें लक्षण हरि सांगे ॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel