मामेव सर्वभूतेषु, बहिरन्तरपावृतम् ।

ईक्षेतात्मनि चात्मानं, यथा खममलाशयः ॥१२॥

भावें करितां माझी भक्ती । शुद्ध होय चित्तवृत्ती ।

तेणें आत्मदृष्टीची स्थिति । गुरुकृपा पावती मद्भक्त ॥७३॥

पाहतां निजात्मदृष्टीवरी । मीचि सर्व भूतांच्या अंतरीं ।

अंतरींचा हा निर्धार धरी । तंव भूताबाहेरीही मजचि देखे ॥७४॥

जो परावरादि अनंत । तो मी भूतां सबाह्य भगवंत ।

मी तोचि होय माझा भक्त । मिळोनि मज आंत मद्रूपें ॥७५॥

जैसजैशी माझी व्याप्ती । तैसतैशी भक्तांची स्थिती ।

जें जें देखे भूतव्यक्ती । तेथ सबाह्य प्रतीती मद्रूपें ॥७६॥

जेवीं घटामाजीं घटाकाश । तेंचि घटासबाह्य महदाकाश ।

तेवीं भूतांसबाह्य मी चिद्विलास । माझा रहिवास निजरुपें ॥७७॥

निश्चयेंसीं निजप्रतीती । भगवद्भाव सर्वांभूतीं ।

तेचि भक्तांची भजती स्थिती । यथानिगुती हरि सांगे ॥७८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel