सुविविक्तं तव प्रश्नं, मयैतदपि धारयेत् ।

सनातनं ब्रह्म गुह्यं, परं ब्रह्माधिगच्छति ॥२५॥

ज्ञाते तरती हें नवल कोण । परी भाळेभाळे जे अज्ञान ।

त्यांसी उद्धरावया जाण । उद्धवा तुवां प्रश्न पुशिला ॥२२॥

त्या प्रश्नानुसारें जाण । म्यां संतोषोनि आपण ।

सांगितलें गुह्य ज्ञान । परम कारण परब्रह्म ॥२३॥

जेवीं वत्साचे हुंकारें । धेनु स्त्रवत चाले क्षीरें ।

तेवीं तुझेनि प्रश्नादरें । मी स्वानंदभरें तुष्टलों ॥२४॥

तेथ न करितांही प्रश्न । होतां तानयाचें अवलोकन ।

कूर्मी नेत्रद्वारां आपण । अमृतपान करवीत ॥२५॥

तेवीं उद्धवा तुझें अवलोकन । होतां, माझें हृदयींचें ब्रह्मज्ञान ।

तें वोसंडलें गा परिपूर्ण । तें हें निरुपण म्यां केलें ॥२६॥

येणें निरुपणमिसें । परमामृत सावकाशें ।

तुज म्यां पाजिलें अनायासें । स्वानंदरसें निजबोधु ॥२७॥

सिंधु मेघा जळपान करवी । तेणें जळें मेघ जगातें निववी ।

तेवीं उद्धवाचिये ब्रह्मपदवीं । जडमूढजीवीं उद्धरिजे ॥२८॥

जेवीं वत्साचेनि प्रेमभरें । गाय दुभे तें घरासी पुरे ।

तेवीं उद्धवप्रश्नादरें । जग उद्धरे अनायासें ॥२९॥

तो हा प्रश्नोत्तरकथानुवाद । माजा तुझा ब्रह्मसंवाद ।

निरुपणीं एकादशस्कंध । हा अर्थावबोध जो राखे ॥४३०॥

अथवा हें निरुपण । सार्थकें जो कां करी श्रवण ।

तैं श्रोते वक्ते उभय जाण । ब्रह्म सनातन स्वयें होती ॥३१॥

जगीं ब्रह्म असतां परिपूर्ण । मनबुद्धिइंद्रियां न दिसे जाण ।

जेथें वेदांसी पडिलें मौन । तें गुह्यज्ञान पावती ॥३२॥

ज्ञान पावलिया पुढती । कदा काळें नव्हे च्युती ।

हा एकादशार्थ धरितां चित्तीं । पदप्राप्ती अच्युत ॥३३॥

श्रोते वक्ते एकादशार्थी । एवढी पदवी पावती ।

मा मद्भक्तांसी अतिप्रीतीं । जे उपदेशिती हें ज्ञान ॥३४॥

त्यांच्या फळाची फलप्राप्ती । ज्ञानोपदेशाची शुद्ध स्थिती ।

उद्धवालागीं अतिप्रीतीं । स्वमुखें श्रीपती सांगत ॥३५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel