पंडूची दुसरी पत्नी माद्री हिच्या पोटी भगवान अश्विन कुमार यांच्या आशीर्वादाने जन्मलेल्या या दोन पांडवांबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी -
.
नकुल आपली सुंदरता आणि मोहक चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध होता. कौरवांची बहिण दुशला नेहमी त्याच्या सौंदर्याची स्तुती करत असे.
सहदेव हा एकमेव मुलगा होता, ज्याला पंडूने स्वतःच्या शरीराचे मांस खाण्यासाठी विनंती केली. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून त्याने आपल्या वडिलांच्या मेंदूचा भाग खाल्ला. यामुळे सहदेवाला भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहण्याची शक्ती प्राप्त झाली.
नकुल आणि सहदेव यांना प्राण्यांची संभाषणे समजायची. त्यांना वनस्पती आणि प्राणी यांचे विचार, संवाद आणि कृती समजत असे.
नकुल आणि सहदेव यांनी वैद्य देवता आणि त्यांचा जन्मदाता असलेल्या अश्विन कुमार यांच्याकडून आशीर्वाद मिळवला होता. अश्विन कुमाराकडून मिळालेल्या वरदानानुसार दोन्ही बंधूंना आयुर्वेदाचे प्रचंड ज्ञान होते. प्राण्यांच्या जखमा आणि हाडे कश्या दुरुस्त कराव्यात यावर देखील त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या उपचारांनी कोणीही सजीव तत्काळ बरा होत असे.
अज्ञातवासाच्या काळात नकुल आणि सहदेवने मत्स्यराज्याच्या पदरी वेश बदलून चाकरी केली होती. त्यांच्याकडे गोशाळेचे काम देण्यात आले होते. त्यांच्या देखरेखीखाली गायींनी जास्त दुध देण्यास सुरुवात केली, मरगळलेले घोडे सुदृढ आणि चपळ झाले.
नकुल पावसात घोडेस्वारी करून सुद्धा भिजत नसे. तो प्रकाशाच्या वेगाने घोडा पळवत असे. घोड्यावर बसून एखाद्या किल्ल्याच्या भिंतीवरून सुद्धा तो सहज उडी मारत असे.
सहदेव हा मात्र अतिशय चतुर होता. त्याचे ज्ञान अफाट होते. तो भविष्यातील घटना सांगत असे, तसेच गूढ गोष्टींवर देखील त्याचे प्रभुत्व होते. दुर्योधनाच्या सांगण्यावरूनच सहदेवाने कुरुक्षेत्राच्या युद्धासाठी शुभ तारीख निवडली होती.
नकुलच्या लढाईमधील शंखाला सुघोश आणि सहदेवच्या शंखाला मनी पुष्पक म्हटले जाई.
नकुलने धारदार आणि तळपती तलवार हे आपले मुख्य हत्यार म्हणून निवडले, तर सहदेवने कुऱ्हाड त्याचे मुख्य हत्यार म्हणून निवडले.
कुरुक्षेत्र युद्धाच्या १८ व्या दिवशी नकुलने आपल्या काकांना आणि उरलेल्या इतर कौरवांना पराभूत केले, परंतु तो त्यांना ठार मारू शकला नाही.
द्रोपदीला द्यूतात जिंकल्यानंतर तिचा सार्वजनिकरित्या झालेला अपमान बघून सहदेव याने शकुनीला मारण्याची शपथ घेतली. सहदेवने शकुनीला कुरुक्षेत्र युद्धाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १८ व्या दिवशी ठार मारले. सहदेवला माहित होते की शकुनीचा मृत्यू आपल्याच हातून होणार आहे, कारण तसे भविष्य त्याने पाहिले होते. त्यामुळे योग्य वेळ येण्याची त्याने वाट पाहिली आणि आपल्या पत्नीच्या अपमानाचा बदला घेतला.