लेखक -    संकेत मुळगावकर

कोपरखैरणे नवी मुंबई
मो. 9594812779

IPA (Indian Pharmaceutical Association) तर्फ़े फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी घाटकोपरमध्ये  ब्लड बँक विझिट आयोजित करण्यात आली होती. मी सुद्धा गेलो होतो, तसं घाटकोपरमध्ये आमचे जास्त कोणी नातेवाईक राहत नसल्याने तिथे जाण्याचा माझा पहिलाच अनुभव.

त्यानीं तीन वाजताच रिपोर्टिंग टाईम होतं,  आम्ही सर्वजण ( म्हणजे आमची गँग ) डबा खाऊन दीडच्या सुमारास कॉलेजमधूनच घाटकोपरसाठी रवाना झालो. मस्त, मजेत एकमेकांची खेचत(कॉलेजलाईफ एन्जॉय करत... ) स्टेशनकडे चाललो होतो, कोपरखैराणे ते ठाणे आणि ठाणे ते घाटकोपर असा ट्रेनचा मार्ग होता.

ट्रेनचा प्रवास  मला नेहमीच आनंद देणारा आणि कुतूहलाचा वाटतो, ती स्टेशनवरची गर्दी, ट्रेन पकडण्यासाठी लोकांची धडपड, तिकिटासाठीची लाईन, टीसी ने पकडलेला विदाऊट तिकिटवाला प्रवासी, "अगला स्टेशन..." किंवा " कृपया गाडीचे पायदान व फलाटांमधील अंतर...." असं सारखं ओरडणाऱ्या त्या बायकां हे सगळं अनुभवायला खूप छान वाटतं.

मग आम्ही कोपरखैरण्यावरून  ठाण्याला गेलो आणि तिथून दुसऱ्या ट्रेनची वाट बघत उभे होतो, तेवढ्यात मला तिथं एक वयस्कर जोडपं दिसलं, ते गावाकडून आल्यासारखे (पोशाखावरुन) वाटत होते. डोक्यावर गांधीटोपी, सदरा, धोतर, हातांत एक कापडी पिशवी असा आजोबांचा  तर नऊवारी साडी आणि डोक्यावर पदर असा आजींचा पेहराव होता. त्यानां बघताक्षणी मला माझ्या आजी-आजोबांची आठवण झाली. दोघांच्याही चेहऱ्यावर जग जिंकल्यासारखे निर्मळ भाव दिसत होते. असं एक स्मितहास्य की जे  जीवनातील अंतिम सत्य किंवा साक्षात्कार अनुभवल्यावरच येत असावं कदाचित. त्या आजींनी आजोबांचा हात आपल्या हातात पकडला होता आणि ती पुढे लागून लोकांना पैसे मागत होती. मला आश्चर्य आणि वाईट दोन्ही वाटतं होत.

हे सर्व बघून मनात विचारांच चक्र गरगर फिरत होतं, असं काय झालं असेल की त्यांच्यावर ही वेळ यावी?,  त्यांच्या मुलाला ओझं  झालं असेल का यांच, की इथल्या गर्दी मध्ये हरवले असतील हे बिचारे, की गावाला जाण्यासाठी पैसे नसतील यच्याकडे म्हणून  मागत असतील असे अनेक विचार मनात धावाधाव करू लागले. का माहीत नाही... पण त्यानां जाऊन विचारायची माझी हिंमत होत नव्हती. आपल्याला होईल तेवढी मदत करू म्हणून हात खिश्यात गेला तेवढ्यात ट्रेन आली, मित्र पण हाका मारू लागले आणि मग मी सुद्धा ट्रेन मध्ये चढलो... त्यानां मदत न करताच.

ट्रेनमध्ये बसायला जागा भेटली, आजूबाजूला खूप गोंधळही होता, पण मन शांत होत, स्थिर होत, स्तब्ध होत...शेवटी मी सुद्धा तेच केलं जे सर्वजण करतात आणि हे सिद्ध केलं कि, मी पण माणसाच्या जातीतलाच , त्यांचे गुणधर्म कसे काय सोडणार; नाही का...?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel