घन पिता मम जो नटवी धरा,

मम असे जननी गिरि-कन्दरा;

जननिचे शरिरीं बहु नाचतीं,

खदखदा हसतों अणि खेळतों.

जलनिधी मम थोर पितामह;

सतत त्या सरिता-भगिनींसह

त्वरित भेटुं म्हणोनिच धावतों,

तरि वनस्पतिला तटिं पोसतों.

गगनचुंबित हे तरु लागती,

मम सुतावलि तीरिं मदीय ती;

पुजुनिया निज कोमल पल्लवें

मजवरी तरुराजि शिरें लवे.

हरित घालुनि वस्त्र तटीं, स्वतां

प्रणयरूपवती युवती लता

हरितपल्लवशालुस लेउनी

नटुनिया दंवमौक्तिक-भूषणीं-

विविध वर्णि अलंकृत होउनी

तरुपतीस अती कवटाळुनी

सुतनु त्या हसती सुमनें किती !

मम तटीं रमती पतिशीं अती.

प्रणय त्यांवरिही मम निश्चित;

मम जलांतरिं होउनि बिंबित

जरि विलोल तरी ह्रदयीं पहा

वसति त्या मम संततहि अहा !

कनकगोल रवी उदयाचलीं

सहज नाशित येइ तमावली;

तरुंतुनी कर घालुनि तो बळी

बहु सुवर्णसुमें उधळी जळीं.

पवन वंशनिकुंजिं शिरोनिया

श्रुतिमनोहर गान करोनिया

उठवितो द्विजवृक्षलतादिकां,

म्हणतसे, "प्रभुगान करा न कां ?"

खळखळाट तईं तम ऐकुनी

जळहि निर्मल हें मम पाहुनी

पिक करी मधुर प्रभुगायन;

करि मयूरहि तन्मय नर्तन.

सरसरा तरती बदकें जिथे

अचळ हो जळ दर्पणतुल्य तें;

उसळती जळिं चंचळ मासळ्या,

टपति त्या बक धीवर पंकिं या.

तरुंतुनी नृपतीसम वाहुनी

चमकतोंहि कुठें कुरणांतुनी,

कृषक लावित या तटिं शेत तो,

मधुनि मी विभवें स्थिर वाहतों.

जिथेजिथे वसतों, मज पाहतां

प्रमुदिता दिसते वनदेवता;

सुमफलांसह सज्ज सदैव ती

सुखविण्यास समा सकलां सती.

थकुनि भागुनि पांथ कधीं जरी

दुरुनि येइ तृषातुर या तिरीं

निवविं ताहन मी अपुल्या जळें.

निववितातहि भूक तरू फळें.

रविकरें गिरि-कानन तापती

परिभयें कर या जळिं कांपती !

रवि कसा मग तापद हो तया

पथिक जो कुणि ये मम आश्रया ?

मम तटीं पसरे घन सावली,

कधिं न वास करि कलि या स्थलीं;

झुळुझुळू स्वन मंजुळ गाउनी

निजवितों पथिकां मन मोहुनी.

मग कसा तरि होय न तुष्ट तो ?

स्वसदनीं सुत-पत्‍निंस सांगतो,

'कितिक रम्य असे तरि निर्झर !

अमित धन्य जगांत खरोखर !'

कधिकधीं रमणी रमणांसह

क्रमिति या तटिं काल सुखावह

नयनिं तें निज जीवित अर्पुनी

प्रणयकूजनिं मग्न इथें वनीं,

कर करांत अशंकचि घालुनी

बसति वंशनिकुंज सुखी मनीं.

पवन दे सुख शीतल वाहुनी,

सुखवितो पिक मंजुळ गाउनी.

विरहिणी विरहानलतापिता

कृशतनू बसते तटिं दुःखिता,

म्हणतसे, "सुख देशि जनां खरा,

मजशि दुःखद कां मग निर्झरा ?

तव तटीं रमती तरुंशीं लता

कधिं रमेन तशी पतिशीं अतां ?

नव सुमें फुलती तव या तिरीं,

मदनसायक तीव्र उरीं तिरी !"

उटज बांधुनिया तटिं तापसी

सुतप आचरिती सुखि मानसीं,

सतत चिंतन ते करिती इथे,

कितिक सेविति ते सुखशांतितें !

जळ मृगेंद्र तसे मृगही पिती,

द्विज तसे अतिशूद्र पिती किती !

लघु व थोर असा मुळिं भाव तो

मम मनांत कधींहि न राहतो.

किति युगें असति तरि लोटलीं,

नृपकुलें किति मीं तरि पाहिलीं,

विकृति जाहलि या जगतीं किती !

पलटली मनुजा, तव ही स्थिती.

दिवस वा रजनी, सुखदुःखहीं,

जननमृत्यु घडो जगिं कांहिंही;

तरिहि वाहतसें स्फटिकासम,

खिदळणें जगिं चालतसे मम.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel