वेणूंत नादसम नित्य सुखे, ह्रदयांत

प्राणशी विहरशी, उगम सुखाचा आंत.

आधीं तो जाय फुटोनी जेधवा

लोपतो नाद तेथोनी तेधवा

शवसमान त्यावांचोनी तेधवा

दे त्रास बांस नेत्रांस, काय मग त्यांत ?

तुजवीण मी तसा भग्न बांस जगतांत.

रस जसा भरे जीवसा मधुर कवनांत

त्यापरी विहरशी सखे, सदा ह्रदयांत !

रस जातां कवनांतून सुंदरी,

जाल शब्द त्यावांचून सुंदरी,

सुख काय तया वाचून सुंदरीं ?

जाउं दे जाल तें लया - शवच अनिलांत !

तुजवीण मी तसा व्यर्थ जाल जगतांत.

ज्यापरी मधुप सुंदरी, मधुर कमलांत

त्यापरी गुंतलें हुदय तुझ्या प्रणयांत.

मधुलोलप होई लीन त्या स्थळीं

उन्मत्तचि छलबलहीन त्या स्थळीं

स्थळ काळ तया राही न त्या स्थळीं.

जगताचा स्वामी पूर्ण तया कमलांत,

धुंद मी प्रणयिं तव, काय बाह्य जगतांत ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel