पुंगीवाला

नगर सुंदर एक महेश्वर,

जवळ उत्तर बाजुस डोंगर,

नदि अफाट भयंकर नर्मदा

खळखळाट तिथे करि सर्वदा.

स्थळ सुरम्य नसे दुसरें असें

नगर भारतभूषण तें असे;

कथिन गोष्ट तुम्हांप्रति तेथली

घडुनि जीं शतकें नउ जाहलीं.

वृत्त - द्रुतविलंबित

२.

सुखी असोनी जन तेथ एकदा

आली तयांच्या नशिबास आपदा,

तया पुरीं उंदिर फार माजले

त्यांच्या अनर्थ जन सर्व पीडले.

भिती मनीं श्वान बघोनि त्यांना,

लीलेंच ते मारिति मांजरांना,

फराफरा ओढिति तान्हुल्यांना,

धावोनिया चावति बालकांना !

मोठ्यांसही खाउं न घास देती,

ओढोनि हातांतुनि अन्न नेती;

कडाकडा फोडिति जाड माठ,

दुधादह्याची मग काय वाट ?

केले बिछाने पगड्यांमधून,

शाली नव्या टाकिति कुर्तडून;

चिंध्या बनोनी किति कापडांच्या

राशी पडाव्या किति रोज त्यांच्या !

आल्या जरी चार घरास बाया

न सोय ती शब्द मुखें वदाया;

साधोनिया मंडळ भोवताली

दाटी करोनी मग एक कालीं

करोनि चीं चीं अति तीव्र घोर

गोंगाट देती उडवोनि थोर,

किती करावा दुसरा हमामा !

वर्णावया शक्ति न खास आम्हां.

वृत्त - उपजाति

३.

बहू जाहले त्रस्त ते लोक सारे

मिळोनी तदा सर्व एक्या विचारें

निघे घोळका चावडीलागि त्यांचा,

गराडा पडे भोवताली जनांचा.

म्हणे एक कीं, मठ्ठ कोतवाल

करा रे कुणी यांस ऐसा सवाल;

"कशाला तुम्हांला जरीदार फेटे,

नटायाथटायास शेलेदुपेटे ?

पशांनीं तुम्हां ओतितों कीं पगार

न कांहींच याचा तुम्हांला विचार ?

अहो चालला आमचा येथ जीव,

न याची तुम्हां बूज, कीं ये न कीव ?

हवें लांबवीन बसायास पाय

सुचावा कसा उंदरांचा उपाय ?

मिजाशी पुरे ही; स्वकर्मास जागा,

चला उंदरांच्या उपायास लागा !

पडूं द्या जरा त्रास त्या मस्तकास

वळूं नातरी आपली मोट खास !"

असे शब्द येतांच कानीं जलाल

भयें जाहले पांढरे कोतवाल !

वृत्त - भुजंगप्रयात

४.

बघा जरासे मुखाकडे त्या अतां कोतवालांच्या,

कसें दिसे भयचकित वासलें ! बसली त्यांची वाचा !

आधिंच मुख तें जसें ठेविलें माठावरि टरबूज,

वर्तुळ झालें शरीर, चढली जणों चहुंकडे सूज.

काय नयन निस्तेज, शिंपली जुनी मलिन ती जेवी.

बघुनि मात्र रसभरित ताट ज्या झळक नवी उजळावी.

भयें फाडिले तेज बघावे आतां त्यांचे डोळे,

कसे दिसति बटबटित बटाटे कीं मेदाचे गोळे.

बराच जातां वेळ हळुहळू वाचा फुटे तयांस

म्हणति, "नको ते शेले तुमचे, पुरवे मज वनवास !

काय करावें ? उपाय न सुचे, करितों किती विचार,

भणाणलें हो शिर हें माझें ताणुनिया निःसार.

काय वेंचतें 'उपाय काढा' ऐसें मुखें वदाया ?

सुलभ बोलणें परी न सोपें स्वकरें कृती कराया !

पिंज्‌रा तरि' - वदणार पुढें तों पट्‌पट् वाजे दारीं-

बघा दचकले कोतवालजी, घाबरली ही स्वारी !

काय वाजलें पाउल ! कीं हे आले उंदीरमामा ?

उंच करोनी मान पाहती सारुनि सार्‍या कामा !

वृत्त - लवंगलता

४.

बघति टकमक हे सकल नयन काय ?

मूक व्हाया काय या मुखां होय ?

कुठुनि येई ही मूर्ति अति विचित्र ?

कोण रेखाटूं शके इचें चित्र ?

रंगिबेरंगी झगा पायघोळ

लाल पिवळा अति सैल, पडे झोळ;

अंगकाठी किति रोड, उंच काळी,

उरं केसांची दाट झुले जाळी.

तीक्ष्ण लोचन अंगार पेटतात,

मिशा दाढी उभयतां भेटतात;

अधिंच त्याचें भाल तें भव्य मोठें,

वरी भस्माचे ओढले फराटे.

शेंदुराचा वरि तिलक रसरशीत,

नयनिं तिसर्‍या जणुं अग्नि धगधगीत,

दोन्हि कानीं रुद्राक्ष डोलतात,

रुळे स्फटिकाची माळ ही गळ्यांत.

खणन्‌ खणके लोखंडि कंकणाची

जोड डाव्या हातांत सैल साची;

मुखीं उजळे मृदु हास्य, मावळेही;

मूर्ति कोठिल कोणा न आकळे ही.

तया पुरुषा, वेषास चित्र त्याच्या

बघुनि बोले कुणि पौर अशी वाचा;

काय कोणी हे पितर अवतरोनी

इथे स्वर्गाहुनी येति का वरोनी ?

वृत्त - दिंडी

६.

किंचित् पुढें तो सरसावुनीया

बोले जनांला नर हासुनीया,

'प्रभाव माझा न तुम्हांस ठावा,

माझ्या मुखें मींच कसा कथावा ?

जे जे जगीं जन्मति जीव-जात,

त्यांचें असे जीवन ह्या करांत;

जे रांगती, चालति, धावती जे,

जे पोहती कीं उडती नभीं जे,

आकर्षुनी त्यांस मनाप्रमाणें

मी नाचवीं जादुचिया बलानें

त्यांच्यावरी जादु करीं परंतु

जे त्रास देती जगतांत जंतू-

जे व्याघ्रसिंहादिक जीव हिंस्त्र

कीं गोमसर्पादि दुजे सहस्त्र.

ठावा जरी मी न असें तुम्हांला,

प्रख्यात मी गारुडि पुंगिवाला !"

काखेंतुनी काढुनि पुंगि हातीं

पुढें करोनी फिरवी जरा ती;

पुंगी अशी दृष्टिसमोर आली,

झग्यामधें आजुनि जी दडाली.

बोटें तयाचीं स्फुरतात भासे

तीं वाजवायास जणों विलासें !

परी दिसे मूकचि शांत पुंगी,

आली निजेची जणुं तीस गुंगी.

बोले पुन्हा तो मग त्या जनांला,

"गरीब हा मी जरि पुंगिवाला,

तार्तार-देशीं जधिं टोळ आले,

मेघावरी मेघ जसे निघाले,

या पुंगिनें नाशुनिया तयांला

सुल्तान मीं तेथिल सोडवीला;

इराण-देशीं घुबडें निघालीं,

तान्ह्या मुलांची स्थिति घोर झाली !

आला शहा काकुळतीस भारी,

पुंगीच ही संकट तें निवारी.

ज्यांचा तुम्हांला न सुचे उपाय,

त्या उंदरांची मग गोष्ट काय ?

नाशीन ते, मात्र करा विचार,

मोजून घे मी रुपये हजार"-

"हजार का ? मी परि लाख देतों"

तैं कोतवाल प्रभुजी वदे तो.

वृत्त - उपजाति

७.

हासत गारुडि शीघ्र निघे जणुं जाणतसे निजमंत्रबळाते;

ते स्फुरती बहु ओठ, तसे कर फुंकुनि पुंगिस वाजविण्यातें;

चंचळ लोचन लाल निळे झळकूं मग लागति ते लवलाही

ज्योत जशी झळके बहु तीवर झोकियलें जर मीठ मुलांहीं

वृत्त - हेमकला

८.

फुंकितां गीत पुंगींत

किति चमत्कार मग झाला !

बहु विचित्र पुंगीवाला !

चहुंबाजू पटपट ध्वनि उठे,

अफाट जणुं का सैन्य पुटपुटे,

क्रमें उंच हो घर्घर दाटे,

जणों सैन्य तें धावे वाटे.

ध्वनि दणाणला क्रमें भयंकर,

जणों धावती रथादि भरभर;

घरांमधोनी उंदिर नंतर

उड्या टाकिती किति वरचेवर !

येथुनि उंदिर, तेथुनि उंदिर,

उंदिर खिडक्यांतुनी फडकती,

झरोक्यांतुनी टप्‌टप् पडती,

एकचि धांदल उडे मग किती !

एकावरुनी एक धावती

उंदिर काळे, उंदिर पिवळे,

उंदिर पिंगट, उंदिर ढवळे,

उंदिर करडे आणि सावळे,

उंदिर डोळस आणि आंधळे,

लठ्ठ, मठ्ठ, कोडगे, रोडके,

चंचल धावति वृद्ध-बालकें,

शिष्ट ऐटिनें डोलत चालति,

गुंड बंड ते नाचत निघती

किती शेपटें मजेंत फिरविति,

किती मिशांवत ताव चढविती,

आयाबापहि, सुना, सासवा,

चुलत्या, चुलते, नणदा, जावा;

मामा, मामे, भाऊ, बहिणी,

धनी आणखी गडी, कुणबिणी,

यापरि निघती कुळेंची कुळें

घेउनिया पाहुणे-राउळे,

ज्यापरि सागरिं लाट जळावरि

वाट भरे नगरांत त्यापरी;

तरंग ज्यापरि हेलकावती,

वळवळ खळबळ उंदिर करिती,

अफाट ही उंदरांचि सेना,

कोणिकडेही भुई दिसेना.

पुढें चालला पुंगीवाला

फुंकित पुंगिंत मृदु गीताला;

मागुनि हा घोळका निघाला

नाचत, साच न उपमा त्याला-

जो तयांवरी ये घाला

स्वप्नही न त्याचें त्यांला !

वृत्त - कटाव, जाति पादाकुलक

 

९.

यापरी नगरांतले मग सर्व उंदिर घेउनी

ठाकतां क्षणिं गारुडी नदिच्या तिरावर येउनी;

घेति शीघ्र उड्या पटापट त्या नदीमधिं उंदिर,

लोपला निमिषांत संचय तो जळांत भयंकर.

एक उंदिर त्यांतला अति धष्टपुष्टचि भीमसा

जाय पोहुनि नर्मदाजल पैलपार जसातसा;

गांठुनी अपुली विलायत बंधुंना निज भेटला,

सांगतां अपुली कथा बहु अश्रु-सागर लोटला.

वृत्त - विबुधप्रिया

 

१०.

कथा सांगे यापरी निज सख्यांला,

"नाद पुंगीचा गोड जधीं झाला,

फुटति नारळ हो ध्वनी गमे त्याचा,

मुरंब्याचा बरण्याच उघडण्याचा !

जणों कोणी श्रीखंड फेणतात,

काय भांड्यांतुनि राब ओततात,

दुधा-लोण्याचीं उघडती कपाटें,

मधुर अन्नें भरतात कुणी ताटें !

फळें ताजीं परिपक्व अति रसाळ

रचुनि राशी करितात जणुं विशाळ,

जणों आमंत्रण करी अम्हां कोणी

मधुर मोहक काढोनि अशी वाणी-

वृत्त -जाति दिंडी

११.

आमंत्रणमंत्र

या उंदरांनो ! या रे या !

सहपरिवारचि सारे या !

मजा करा रे ! मजा मजा !

आज दिवस तुमचा समजा.

दूध, दही,

तूप, मही,

मधुर फळें

घ्या सगळे !

या ! बाजार भरे दुनिया,

घ्याच हवें तें चाखुनिया.

या उंदरांनो, या रे या !

सहपरिवारचि सारे या !

मालटाल या रे उडुं द्या,

घडि न आजची परत उद्यां;

भले बहाद्दर ! खूप भिडा !

हवे तसे या, तुटुनि पडा !

आहारीं,

व्यवहारीं,

भीड नको.

भीति नको.

तर मग चंगळ उडवुनि द्या,

टंगळमंगळ सोडुनि द्या !

या उंदरांनो, या रे या !

सहपरिवारचि सारे या !

जाति - अचलगति

१२.

दिसे फारचि विस्तीर्ण एक भांडें

तुडंबोनी ज्यांतूनि पाक सांडे

कसें झळके, जणुं सूर्य ! अम्हां बाहे,

घेउं जातों तों नदी उरीं वाहे."

जाति - दिंडी

१३.

आनंदी आनंद उडाला महेश्वरीं मग भारी,

जिकडे तिकडे ध्वजा फडकती, झडति चौघडे दारीं !

जरा बघा तर कोतवालजीकडे, फुले सुख केवी !

हुकुमावर किति हुकूम सुटती, संचरली जणुं देवी !

"सुतार आणा, गवंडि आणा, बुजवा छिद्रें सारीं;

खूण न राहूं द्या उंदरांचि, गुढ्या उभारा दारीं.

करा सडा-सम्मार्जन, घाला रांगोळ्या रंगीत;

सणासारखा दिवस समजुनी गा मंगल संगीत.

मिष्टान्नांचा थाट उडूं द्या घरोघरीं नगरांत,

पूर्वपुण्य ये उदया भाग्यें, सुख पडलें पदरांत !"

प्रगटे अवचित ऐन रंगिं या मुख गारुडिबोवाचें !

म्हणे, "प्रथम ते हजार रुपये टाका मोजुनि साचे !"

जाति - लवंगलता

१४.

"हजार रुपये !" असा ध्वनिच मात्र कानीं पडे,

जरा वळुनिया बघा त्वरित कोतवालाकडे,

कसें वदन जाहलें सकळही निळें जांभळें !

हजार रुपये ? कशी रक्कम गारुड्याशीं मिळे ?

तिजोरि नगरोत्सवी अधिंच ती रिकामी पडे,

हजार रुपये ? कशी रकम द्यावया सांपडे ?

कशास तरि गारुड्याप्रति भिकारड्या संप्रती

भरा रकम ? कां अधीं भरुं नये तिजोरीच ती ?

कुशाग्र बहु बुद्धिचे खचित आमुचे अग्रणी,

उगीच डगतील का कधिंहि ते जिभेच्या रणीं

हळूच मिचकावुनी नयन हासुनी बोलती,

"स्वकार्य तर साधलें नदिमधें, न आतां भिती !

गिळोनि अमुची बसे सकल उंदिरां नर्मदा,

जगांत मृत जाहले, परत काय येती कदा ?

तथापि तुजला गड्या, कधिं न पाठवूं विन्मुख;

उदार पुर आमुचें सकलही जगा ठाउक.

निमंत्रण तुला दिलें समज, आज ये भोजना,

तमाखु वर घे, तयावरिहि आणखी दक्षिणा;

अधींच नगरोत्सवीं सकल हो खजीना रिता,

उदारपण आणखी अधिक ये कसें दावितां ?

धनाविषयिं बोललों, सकलही विनोदांत तें !

तुलाहि कळतां वृथा विचकतोस कां दांत ते ?

हजार रुपये तुला ! फुकट वाणिचें तांडव !

हजार ? चल जाउं दे, गणुनि घे पुरे पांडव."

वृत्त - पृथ्वी

 

१५.

झाला तेव्हा लाल तो पुंगिवाला,

आवेशानें बोलला कोतवाला,

'सोडा थट्टा, शीघ्र मोजा धनास,

नाहीं मातें वेळही थांबण्यास.

जाणें आहे भोजना कंदहारीं,

पाहे माझी वाट तेथे अचारी;

झाले विंचू पाकशाळेंत भारी,

प्रार्थी मातें तो बिचारा अचारी.

केला तेथे विंचुवांचा विनाश,

पाचारी तो प्रार्थुनी भोजनास;

व्यापाराची गोष्ट नाहीं तयाशीं,

सोडीना मी एक पैसा तुम्हांशीं.

आहे जाणा गांठ या गारुड्याशीं,

चाले ज्याशीं ना कुणाची मिजासी;

गेली नाही वेळ पाहा अजून,

मोजा वाजे जों न पुंगी फिरून."

वृत्त - शालिनी

१६.

बोले तो मग कोतवाल नटसा तत्काल संतापुनी,

"रे नीचा, वद तूं उणें गणिशि का आम्हां अचार्‍याहुनी ?

टेंभा गाजविशी भिकार डगला घालोनिया पुंगिचा,

कैसा आठवला भिकार तुज हा चाळा तुझ्या हानिचा ?

सोसूं कां वद बोल फोल तुजशा रे भामट्याचे कदा,

दारोदार फिरोनिया उदर तें ज्यानें भरावें सदा ?

धीटा, दाखविशी अम्हांस धमकी त्या पुंगिची बेसुर ?

जा जा फुंकचि फुंक ! फुंकचि फुटे जों तें तुझें रे उर !"

वृत्त -शार्दूलाविक्रीडित

 

१७.

फिरुनि अवतरे मार्गावर तो भरभर पुंगीवाला,

श्रवण-मनोरम फुंकित पुंगिंत मधुर मधुर गीताला.

ध्वनी तीन नच गुणगुणले तों काय चमत्कृति थाटे,

सळसळ हो रव, जणों उसळली लाल नदी वर वाटे !

झटपट पटपट पाय आपटत, पुटपुट करित मुखानें,

खटपट वटवट ठाकुनि चटचट टाळ्या पिटित करानें,

नाचत भरभर मुलें चिमकुलीं निघती आनंदानें,

गरगर फिरती मधुर पांखरें जशीं उधळतां दाणे.

रुळती कुरळे केस, झळकती मधुर गुलाबी गाल,

दांत झळकती, हिरे तळपती चंचल नयन विशाल !

मधुर मनोहर गीत वाजवित चाले पुंगीवाला,

मुलांमुलींचा एक घोळका मागुनि शीघ्र निघाला.

जाति - लवंगलता

१८.

जन सकल जादुनें विकल ठिकाणीं खिळले;

वदवे न, न हलवे, जणुं चित्रें ते बनले.

टकमका पाहती फुका चाललीं बाळें

ज्या बाजुस फुंकित पुंगी गारुडि चाले.

यापरी जाहल्यावरी स्थिती मग हाय !

करणार बापुडे कोतवाल तरि काय ?

धडधडी उरीं, यापुढें काय होणार ?

का सकल सोनुलीं टाकुनि हीं जाणार ?

नदिकडे जधीं सवगडे सकळही वळले

तधिं सकल मुखांचें पळांत पाणी पळलें.

परि जधीं टाकिली नदी वाम अंगास

तधिं जिवांत आला जीव, फुटे मनिं आस !

गारुडी घेववी उडी कसा नदिमाजी ?

का सकल बालगोपाल वधिल हा आजी ?

भरभरा करोनी त्वरा गारुडी चाले;

डोंगराजवळ समुदाय मुलांचे आले.

नच खास उंच शिखरास लंघितिल बाळें,

यापरी मूक जन मनांत म्हणते झाले.

थांबतां पुंगि ही अतां भेटतिल बाळें,

हें मनांत येतां आनंदाश्रू आले.

परि हाय ! होय हें काय ? केवढें दार

डोंगरांत उघडे ! कोण आंत अंधार !

फुंकीत गीत पुंगींत शिरे हा आंत

गारुडी; सकळ हो मुलें हरपलीं त्यांत !

मग पळें दार लागलें, चहुंकडे शांत

जाहले; उडाला पुरिं एकच आकांत !

परि बाळ एक पांगूळ त्यांतलें उरलें,

नच पोचूं शकलें, खिन्न मागुतें फिरलें !

"कां मुला, खिन्न तूं ? तुला काय तरि झालें /"

हें तयास पुसतां, दीनवदन तो बोले,

"टाकुनी मला येथुनी सवगडी गेले,

त्या दिवशीं मुकलों सकल सुखाला अपुले !

स्मरणीय सकल रमणीय वस्तु ते बघती,

त्या कोठुनि आतां या दुर्भाग्या दिसती ?

आजुनी स्मरे तो ध्वनी पुंगिवाल्याचा, दे वचन असें तो कैवारी बालांचा.

जाति - भूपति

१९.

आमंत्रणमंत्र

या बालांनो, या रे या !

लवकर भरभर सारे या !

मजा करा रे ! मजा मजा !

आज दिवस तुमचा समजा.

स्वस्थ बसे

तोचि फसे;

वनभूमी

दाविन मी,

या नगराला लागुनिया

सुंदर ती दुसरी दुनिया.

या बालांनो ! या रे या !

लवकर भरभर सारे या !

खळखळ मंजुळ गाति झरे,

गीत मधुर चहुंबाज भरे;

जिकडे तिकडे फुलें फळें,

सुवास पसरे, रसहि गळे.

पर ज्यांचे

सोन्याचे

ते रावे

हेरावे.

तर मग कामें टाकुनिया

नवी बघ या ही दुनिया !

या बालांनो ! या रे या !

लवकर भरभर सारे या !

पंख पाचुचे मोरांना,

टिपति पांखरें मोत्यांना,

पंख फडकती घोड्यांना,

मौज दिसे ही थोड्यांना.

चपलगती

हरिण किती !

देखावे

देखावे

तर मग लवकर धावुनिया

नवी बघा या ही दुनिया !

या बालांनो, या रे या

लवकर भरभर सारे या !

जाति - अचलगति

२०.

वाटलें व्यंग आपुलें जाय पायाचें

तों पुंगि थांबली, तोंड मिटे शिखराचें.

कुणिकडे सकल सांपडे सौख्य तें आतां ?

भंगलें मनोरथ; कांहिं न आलें हातां !"

जाति भूपति

२१.

महेश्वरी आकांत उडला

तेंहि सांगणें येइ कपाळा,

हळहळतो जन जिकडे तिकडे दुःखचि सकळांला !

एक म्हणे कीं मुलगा गेला,

दुजी म्हणे नेलें नातेला,

एक म्हणे कीं लेक हरपली काय करूं याला ?

चहू दिशांना हेर निघाले,

कोतवाल तो त्यांना बोले,

"शोधुनि आणा पुंगीवाला आणिक तीं बाळें !

सांगा तोंडीं बहु विनवोनी,

'मन माने तों धन घे गणुनी

हिरे, माणकें, मोत्यें, सोनें, परि बाळां आणीं !"

विफल सकल परि यत्‍न जाहला,

पुंगी वाला नच सांपडला,

तेव्हां रडती हात हाणुनी अपुल्या भालाला.

सदा सुखी ह्या कोण जगांत ?

साधूक्ती ही येइ मनांत

धिक्‌ धिक्‌ जीणें धनवंताचें बालाविण त्यांत !

शके नऊशें एकुणतीशीं

आश्विन शुक्ल पंचमी दिवशीं

आली समजा गोष्ट घडोनी खेदजनक ऐशी.

तेव्हां नवशक सुरू जाहला,

अजुनी बघतां दिसे तुम्हांला

त्या काळांतिल लेखांवरती अंतीं लिहिलेला.

ज्या मार्गानें मुलें निघालीं

नांव दिलें त्या 'गारुडिआळी'

ख्यात असे तें नगरामध्यें अजुनी या कालीं.

तेथे वीणा, वेणू, सनई

वाजविण्याची सक्त मनाई

फिरवुनि देई कोतवाल तो ह्यापरिची द्वाही.

कैशी बाळें लुप्त जाहलीं

स्तंभावर ही कथा कोरिली,

उभा असे तो साक्ष द्यावया स्तंभहि या कालीं.

चावडीवरी चहुबाजूंला

शिलालेख हा ठळक कोरिला

विलायतेमधिं अजायब-घरीं अजुनि ठेविलेला.

जाति - कोकिला

 

२२.

असे चीन देशामधें एक जात

निराळी तिची त्या स्थळीं रीतभात,

निराळें तिचें रूप तैसाच वेष,

बघोनी जनीं बोलवा ही विशेष.

कुणी एकदा भूमिच्या गूढ पोतीं

मुलें कोंडिलीं भारतीं सान मोठीं;

तयांची असे संतती येथ आली;

न ठावी परी त्या कशी कोण कालीं !

वृत्त - भुजंगप्रयात

२३.

राहूं चोख 'मथे' म्हणूनि जगतीं तूं मीहि सार्‍यांसह,

मुख्यत्वें परि गारुड्यांसह मुली, ह्या पुंगिवाल्यांसह;

पुंगी वाजवुनी हिरोत मग ते उंदीर कीं मांजर,

पाळूं आपण आपलें वचन गे आधीं दिलें त्यां जर.

कवी - भा. रा. तांबे

वृत्त - शार्दूलविक्रीडित

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel