पातालांतूनि येतां वरवर गगनीं सिंधुमाजी जहाज
पाही कांता वियुक्ता धवलतर अती शीड, आशा मनाची
जागे कीं कांत आतां खचित मजशि दे गाढ आश्लेष आज;
आशा, येतां निशा, ही मम मनिं चमके तेवि त्वत्संगमाची !
साहारीं चंडतप्तीं अविरतचि सदा हिंडातां खिन्न गात्रीं
श्रांता पांथा तृषार्था झुळझुळ रव तो मोहिनी निर्झराचा,
तैसा त्वन्नूपुराचा श्रुतिमधुर अती शब्दही मध्यरात्रीं
ओढी मच्चित्त सारें, श्रवणगत करी इंद्रियें पंच साचा.
प्राची येतां उषःश्री पळ पळ उमले पद्मिनीतुल्य रम्या,
रागें व्यापोनि टाकी कनकसम नभा, श्रीस नाहीं तुला ती;
कांते, त्वन्मूर्ति येतां अनुपम शयनागार लागे खुलाया,
जों अंतर्बाह्य सारें कनकमधुर हो फाकुनी दिव्य कांती.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.