मधुमासामधिं बहार येतो मधुमालतिला गे

पुष्पवती ती प्रथम तूं तशी अधिक खुलों लागे.

स्तनाकार या पीत मुखाशीं लाल फळें लवती

आम्र जशी तूं निधानगर्भा लज्जावति युवती.

नूतनपल्लवरम्या लतिका बहुवर्णीं फुलती,

नूतनवसना मणिमंडित तूं, तेवि अधिक खुलती.

ताम्र अपांगीं सलिलीं कमळें, तुषार ज्यांवरती,

प्रणयाश्रूंनीं नयनें तव, तशिं अधिक मना हारिती.

गुलाबतरुंचीं प्रणयवर्न हीं लाल फुलें तेवी

अधिकचि खुलती लाल गाल तव रागानें जेवी.

मदिरामधुरामोदें मोदें गुंजत कुंजांत

श्वशुरगृहीं जामातसम रमे भ्रमर मरंदांत.

कोकिल, बुल्बुल, मैना हळुहळु मधु गाना वळती

तरुण जनांचे तरंग तैसे स्मरविषया कलती.

स्वैरगती संचरतो मारुत जेवि अंतराळीं

हेतुशून्यही गुंगत बुल्बुल विहरे या काळीं.

अशा प्रसंगीं प्रणयतरंगीं रंगत गुंगत मी

खुळ्यासम तसा एके दिवशीं फिरतां आरामीं,

सरस्तटीं मी टाकीं हिरव्याचार तृणीं अंग,

मनोभिरामीं आरामीं जैं अनंग सबळांग.

भरलें होतें नयनीं ह्रदयीं रूप कुणाचेंसें,

वेड लागलें होतें त्याचें स्वांताला जैसें !

कोकिळ गाती, वाटे ह्रदयीं तीच मूर्ति गाते,

शीतल उपवनपव्न सुटुनि ती स्पर्शे अंगातें !

कुसुमविकासीं तिचेंच भासे विलासहास्यच कीं !

प्रफुल्लकमलीं विलोल लोचन तिचेच अवलोकीं.

असो; यापरी तन्मय दिसलें उपनव तें मजला

सहज विलोकित बसलों असतां दर्पणसम सलिला.

सलील सलिलीं कमळें उमलति, मुकुलित किति दिसती,

झुलती, डुलती, खुलति; पंचमीयात्रेंतिल युवती !

असतां यापरि धुंद कशी तैं चमत्कृती घडली,

अनुपम सुंदर अवचित पडलें बिंब सरःसलिलीं

चकित जाहलों, वरी पाहिलें, निशा नसुनि आली

दिवसा कैशी मूर्ति शशीची बिंबित जलिं झाली ?

मागें वळतां दिव्य मूर्ति मज अनुपम बहु दिसली,

तुच्छ वाटलें मृदुल उमललें कमल रुचिर सलिलीं.

त्या कमलाहुनि मृदुल गवसतां कमल मला तेथे

भान हरपलें दृढालिंगनीं, काय वदों ये तें ?

चित्र कोण हें रेखिल, सुंदर कोण लिहिल गानें ?

कां गे पण तूं लाल जहालिस ऐशी रागानें ?

प्रस्फुरिताधर पल्लव; लोचन लोल तरल कमले;

क्षुब्ध मारुतें वीचितरल जल तैसें ह्रदय हले.

स्मरतें पाहुनि हें किति सुंदर तेंच जलाशय गे !

भृकुटी कुटिल या, कुठिल यापुढे मदनधनू सांगें.

खुळे खुळे ! परि विफल तुझी ही मत्सरमति सारी,

मूर्ति तुंच जी ह्रदयीं भरुनी बिंबे कासारीं.

पुरे पुरे, शांत हो, स्मरण कर, काय न आठवतो

'कमलाकर' - बाळाचा तुजला वाढदिवस वद तो ?

अशिच पहावी तुजला म्हणुनी वदलों संदिग्ध,

नेत्रबाण पण सहन न होती आतां विषादिग्ध,

किती जहाली खोल जखम हें कैसें सांगावें

सदय विलोकन, आलिंगन हें मलम लाव, धावें.

कडकडुनी आलिंगुनि चुंबनि सजल कपोलाला

धन्य असा हा को - पण कोठें लेखनि लिहिण्याला ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel