दुंदुभी दुमदुमे भारी, बिजली जशि चमके स्वारी ! ध्रु०

दुंदुभी दुमदुमे भारी

नभमंडल भरिती भेरी,

किति धुंद दिशा या चारी !

रणकंदन माजे भारी !

गडगडाट या तोफांचा,

खणखणाटही टापांचा,

ऐकुं ये मधें स्वारीचा

ध्वनि वीरां देत हुशारी

लखलखाट तल्वारींचा

चिल्खतें आणि भाल्यांचा,

तिकडील तुर्‍या-तोड्यांचा,

कशि बाइ मूर्ति कंसारी !

झुंजती वीर वीरांशीं,

मधिं तळपे स्वारी खाशी,

पाडीत अरींच्या राशी

खणखणा झडति तल्वारी

जळ झुलें जसें वार्‍यानें

तिकडील तशा शब्दानें

कशिं बाइ झुलति हीं सैन्यें !

देईल विजय मल्हारी.

हां ! दिली पाठ सेनांनी !

परि कशी स्वारि मागोनी

गंभीर धीर शब्दांनीं

अरिवर फिरवि माघारी !

हो अरिची दाणादाण,

लोटलें सैन्य मागून,

चमुशिरीं वारुवर कोण ?

तिकडीलच बाइ भरारी !

सोन्याच्या तबकामाजी

रत्‍नदीप उजळुनि आजी

ओवाळिन स्वारी माझी

विजयासह येतां दारीं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel