सखये, या स्थानीं ऽ वसावें वाटे दिनरजनीं,

पर्णकुटी बांधूनि तरुतळीं गिरिवरि हरिभजनीं

वसावें वाटे दिनरजनीं. ध्रु०

वनदेवींची रम्य भूमि ही, सकळ इथे जमुनी

समंत्र गायन करिति, घालिती फेर चपल चरणीं. १

वनसुमनांची माळा घालिन तुजला स्वकरांनी,

स्नात मुक्तकच पाहुनि तुज त्या गणितिल निज राणी. २

कविह्रदयांतुनि मंजुळ कवनें, तत्सम गिरिमधुनी

खळखळुनी आवेशें निघती निर्मळ निर्झरिणी. ३

देतिल निर्मळ जळ त्या प्याया मधुर सुधेहूनी,

स्मरणिं आणितिल ते प्रतिघोटीं प्रभुजीची करणी. ४

दाट लागले पहा मनोहर तरु खोर्‍यांमधुनी,

कंद, मुळें अणि फळें अर्पितिल अशना स्वकरांनीं. ५

पापशून्य तीं मधुर भक्षुनी वसतां या विपनीं

निर्मळ, निश्चळ, तृप्त मनानें लागूं हरिचरणीं. ६

सूर्योदयिं गातील तरुवरी पक्षि एकवटुनी,

उदात रस ते भरितिल ह्रदयीं, येइल जल नयनीं. ७

मधुर रवें आळवितां हरिला गिरिशिखरीं बसुनी

दिसशिल तूं भैरवी रागिणी रमणी, रविकिरणीं. ८

वीणा घेउनि करीं रवें तव टाकुं दर्‍या भरुनी;

अदृश्य रूपें वनदेवी मग डुलतिल परोसोनी. ९

कविकुलगुरु उभयता प्राच्य आणि पाश्चात्यहि मिळुनी,

वर्षांचें पळ करितिल मंत्रें गुजगोष्टी कथुनी. १०

सखे, अशांची संगति मिळतां काय उनें विपिनीं ?

नको नको ते मधुमुख विषह्रद् नगरमित्र फिरुनी ! ११

पहा पहा गंभीर धीर हे गिरिवर चहुंकदुनी

मूक कसे वक्‍तृत्व ओपिती श्राव्य दिव्य कर्णी ! १२

प्रभुजीचे उपदेष्टे देती ज्ञान इथे बसुनी,

काय भटें त्यापरी श्रुतींचें दुकान घालोनी ? १३

शांत रम्य या पुण्यभूमिचें दर्शन लाभोनी

महापातकी पवित्र होउनि रत हो हरिभजनीं. १४

नको नको प्रासाद नृपांचे दूषित रक्तांनीं !

कुवासनांचे अकांडतांडव सदा नगरसदनीं ! १५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel