हा श्रीविलासांत सदैव लोळे,

तो नित्य दारिद्र्यदशाच सोशी;

हा या जगीं मात्र खरा दरिद्री,

तो ? तो खरा श्रीसुख भोगणारा १

हा मानपानांत निमग्न लोकीं,

तो मात्र निर्माल्य जसा जगांत;

हा मान पावे न कधीं खराच,

तो मान्य, तो पूज्य जगांत होई. २

हा नाचतो स्वर्णमय प्रकाशीं;

तो ? तो पडे निर्जन अंधकारी;

हा राहतो घोर घनांधकरीं,

तो ? तो सदा दिव्य अशा प्रकाशीं. ३

हा केंद्र जेथे मिळतात सौख्यें,

तो केंद्र तीं जेथुनि फांकतात;

हा केंद्रबिंदूकृतसौख्य, दुःखी,

तो ओपुनी तीं सुख नित्य भोगी. ४

हा वांचतो शंभर पूर्ण वर्षे,

तो वांचतो मात्र दहाच सारीं;

हा वांचतो शंभरही पळें न,

तो वांचतो कोटि दहाहि वर्षे. ५

हा पुत्रदारापरिवारयुक्त,

तो एकला, कोण जगीं तयास ?

हा एकला या घर कोठलें तें ?

तो मग्न गेहीं वसुधाकुटुंबी. ६

हा पाहतो दूर सभोवताली,

तो ? तो स्वतालाच सदैव पाही;

हा पाहतां सन्निधही बघे ना,

तो पार पाही क्षितिजाचियाही. ७

हा जिंकितो दुर्बलशां सहस्त्रां

तो जिंकितोही प्रबलास एका;

हा सर्व जिंकोनिहि जिंकलेला,

तो जिंकुनी एक सदा यशस्वी ! ८

हा कोण, तो कोण तुला कळे का ?

जाणावयाची तरि काय इच्छा ?

याला महालांत पहा नृपांच्या,

जा शोध त्यालाहि कुठे दर्‍यांत. ९

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel