कालाच्या चढुनी श्रमें वरिवरी चौर्यायशी पायर्या
अत्युच्चीं नर पायरीवरुनि जो ढुंके न मागें पुन्हा,
कोट्यादी तपुनी तपें करुनिया वातांबुपणार्शना
जो स्वर्गी चढला, बघे तिथुनिया खालील काळ्या दर्या,
सेवी जो अमरांगनासवसुखा गंधर्व कीं किन्नर !
तेजाचा पुतळा अहा ! प्रभुसभासद्रत्न जो मोहक !
आकाशीं शशिच्या प्रकाशिं शयनीं स्वप्नांत तो तारक
हुंगे मात्र मनें अनीतिमदिरादुर्गंध ये जो वर -
उन्मादे शिर तें फिरे गरगरा, काळोख नेत्रां मग,
कोठे कोण न त्या सुचे, डगमगे, हाले, झुले, घेर ये.
येई लोळ झळाळुनी तनुंतुनी, पुण्या पिटाळी अघ,
हा हा हा ! पडला कडाडुनि कुठे ? पाडी जगाही स्वयें.
"झाले लोचन लाल, काल जळलें कोठे कुणाचें घर ?"
ठावा मी असुनी प्रिये, पुसशि हें ? कां कोप ? हा मत्सर !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.