ललितलताकुंजीं स्वरमंजरि, चल चलुं लवलाही,

ललने, चल चलुं लवलाही !

रुचिराधर-धृत-मधुर-नवामृत-लोलुप बहु होई ध्रु०

 

मनोभिरामीं या आरामीं

रमणि, रमूं ये विलासकामी,

उत्सुक झालों बहु जाया ‍मी,

सुखकर ज्योत्सना ही. १

 

ऐकुनि तव रव मंजुल कोमल

वियुक्तकूजितलज्जित कोकिल

वाटे अधिकचि नीडीं लपतिल,

संशय मुळिं नाहीं. २

 

तनुस्पर्श तव शीतल होतां

सुधाकरस्त्रुत सुधा तप्तता

पावेलचि हे वाटे चित्ता,

कर करुणा कांहीं. ३

 

निशिगंधाचा सुगंध सुंदरि,

मुखगंधें तव मंद खरोखरि

होइल, आनंदहि ह्रन्मंदिरिं

उरेल भरुनीही. ४

 

सुमनाचा गे विकास सुंदर,

विलासहासें तव बहु सत्वर

संकोचेलचि पावुनि मत्सर

गमतें मज ह्रदयीं. ५

 

कुंदकळ्या तव दंतपंक्तिला

पाहुनि पडतिल भूमितळाला;

पाहूं चल ये या मौजेला,

माझी विनवणि ही. ६

 

अर्धोन्मीलित कुवलयकलिका

अलसाकुंचित लोचनतिलका

पाहुनि मुकुलित नच होतिल का ?

तरि उपवनिं येईं. ७

 

भ्रुकुटिविलासीं तुझ्या विलासिनि,

कुसुमचाप तो सचाप येउनि,

दास तुझा मज टाकिल करुनी

मंत्रशक्ति तव ही ! ८

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel