गेली ज्योती विझोनिया मग फुका फुंका तयाला किती,

ओता आत घृता, रचोनि समिधा प्रार्था फुलें वाहुनी

झालें स्थंडिल थंडगार मृत तें, ज्योती न ये आंतुनी,

चालूं द्या मग वेदघोष तुमचा, ती वेदिशला रिती.

 

गेली ती शुचिता, पवित्र झळके कोठोनि कांती तिथे ?

लावा दीपशता मशाल उजळा, कर्पूर जाळा उठा,

घंटा घूर पिटा, फुका मग फुका शंखा, नगारा पिटा

थट्टा ती मग वस्तुची ! सकळही कीं फोल छायाचि ते.

 

प्रीतिज्योति विलासिनीच ह्रदया टाकूनि गेल्यावरी

सारी भूप्रमदावली मग झटो, पेटेल कां ती तिथे ?

गेला जादु, पिशाच विश्व मग हें निस्सत्त्व छायेपरी

इंदू इंदु न तो; पिशाच विधुचें ! तारे, रवी हीं भुतें !

 

"जातां मी रविचंद्र येतिल जसे तैसेच"- कां गे अशी

कांते, निष्ठुर बोलुनी ह्रदय हें फाडूनिया टाकिशी ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel