"जाउनी तिला येथुनी दिवस किति झाले !

बोलवा आइला दादा ! " म्हणती बाळें.

किति सरळ बोल हे विमल मधुर वदनाचे !

कां विकल होय मग बाप ? काय त्या बोचे ?

ठेवुनी झणीं लेखणी कां मुलां पाही ?

हा अवचित दचकुनि जणूं डसे या कांहीं !

परि फिरुनि तेच आजुनी घोकती बोल,

"बोलवा आइला" सुटे तयाचा तोल.

झडकरी उठोनी धरी उरीं बाळांला,

वरिवरी चुंबितो, पिसें लागलें याला.

वरिवरीं घट्ट उरिं धरी, करें कुरवाळी

ते कुरळ केस -कां मोह असा या काळीं ?

परि काय तयाचें हाय मुग्ध बालांस ?

पुनरपी तेंच हो, काय करावें यांस ?

कोंबितो उरीं परत तो उसासे अपुले,

त्यां अंकींघेउनि सकंप कंठें बोलेः-

"कां म्हणुनि आज ही फिरुनि आठवण झाली

सोनुल्यांस माझ्या तिची अशी या काळीं ?

तिजविणें कांहिं का उणें असे छबिल्यांस ?

मग खंत तिची कां अशी बरें तुम्हांस ?

न्हाणितों, जेवुं घालितों, करवि अंगाई,

मग तुमची आई मीच, म्हणा मज आई."

"तिजविणें कशाचें उणें ? पण तुम्ही दादा !"

तीं म्हणती, "दादा, बाजू अपुली साधा."

"येईल कधीं घेईल अम्हांला आई ?

हा घेइल पापा ? देइ दुधाची साई ?"

किति मधुर मधुर किति अधर ? मधुर ते बोल

परि उरीं बोचिती सुरी पित्याच्या खोल.

तीं दीन माउलीवीण मुलें पाहोनी

भडभडेल ह्रदयीं असो दगड का कोणी !

मग बाप कसा तो ताप हे प्रभो, साही ?

घन मोहतमीं बुचकळे, काय नवलाई ?

चुंबुन, बळें हासुनी पिशापरि हास

तो म्हणे 'उद्यां येईल आइ हो खास !'

हे पूर्ण उमटले जों न शब्द बाहेर,

तों थरारलें घर आनंदें चौफेर.

ज्यापरी झरा गिरिवरी खदखदा खिदळे,

तो अहेतु सैरावैरा गोंदू उधळे.

ज्यापरी सराच्या उरीं थाटते लाट

त्यापरी शांतिच्या बागडण्याचा थाट !

"येईल, उद्यां घेईल आपणां आई;

मग दिवस मजेचा खरा उद्यांचा ताई !"

"मी अधीं देइनच तधीम आइला पापा,

मग खुशाल दे तूं !" अशा चालल्या गप्पा.

"किति किती अतां गम्मती सांगुं आईला !"

यापरी चिमुकली शांति वदे भाईला.

अज्ञान मुलें तीं सान, अनृत त्यां कसलें ?

त्या मनोराज्यसुखिं दंग जाहलीं अपुले.

अज्ञान बापही कां न ? अरेरे देवा !

कां दिधल दुःखद बुद्धिसुखाचा ठेवा ?

स्वप्नांत राज्यसौख्यांत मग्न बहु असतां

किति मरण बरें हो अवचित सपें डसतां?

नाचती मुलें साच तीं, सकल हा थाट-

पक्वान्न चितेवर शिजवुनि भरलें ताट !

तो उभा, तों फुले प्रभा उषेची सदनी;

अंधार कोंदला उरिं, पसरे तो वदनी.

तीं स्वैर मुलें चौफेर गरगरा फिरती,

गरगरा फिरे तो भोवर्‍यांत जणुं सरितीं.

तीं फुलें पाहिलीं मुलें प्रमोदें फुललीं,

हा उभा अचंचल, वृत्ति कुणिकडे झुकली ?

गतकाल सकल तत्काल बालसा जागे,

घनतमीं शुक्रसा प्रगटे, झळकूं लागे.

पातली सती त्या स्थलीं मनोमय युवती

ती नभोद्योति लखलखे उषेची मूर्तीं !

धावोनि मुलें उचलोनि धरिल हातांनीं

तों 'आई ! आई !' ये कोलाहल कानीं.

ज्यापरी सुखी केसरी तरुतळीं निजला

खडबडोनि धावे शर अवचित जरि रुतला;

त्यापरी स्वप्नसुंदरीं सुखीं तो मग्न

असतांना होई अवचित उर तें भग्न !

टाकितो लांब लांब तो पाउलें आतां,

घे अहेतु फेर्‍या; - हाय पळाली कांता !

"ती उद्यां तरी होउं द्या अतां लवलाही !"

आक्रोशुनि म्हणती बाळें, 'आई आई !"

निर्झरी गिरीच्या उदरिं कोंडली असतां

सळसळोनि उसळे स्थळ तिजला सांपडतां;

कोंबिले, उगमिं दाबिले अश्रु आजोनी

खळखळोनि गळती बालवचन परिसोनी.

धुमसतो अग्नि आंत तो होय मग भडका,

वरिवरी उसासे भरी, येउनी हुंदका.

धावुनी मुलें तत्क्षणीं उरीं तो धरितो,

"ती अतांच गेली येउनि" त्यांना म्हणतो,

'अघनिधी जाहले अधीं करीं या धीट;

मी विपाक त्यांचा भोगावा हें नीट !

चिमुकलीं मुलें सोनुलीं विमल निष्पाप -

हे दीनदयाळा, तयांस कां हा ताप ?"

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel