हा 'पु. लं. च्या 'इचलकरंजी साहित्य संमेलन, १९७४' येथील अध्यक्षीय भाषणाचा काही भाग आहे....
इतिहासाला पूर्णविराम ठाऊक नाही. आद्य शंकराचार्यांनी परमेश्वराला देखील 'गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी' असं म्हटलंय. या गतिमान जीवनात वाङ्मयसुद्धा प्रगतच होत रहाणार. तेव्हा नव्या प्रतिमा, नवे शब्द, नवे अविष्कार, नवे विषय आले, तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. त्यातलं अस्सल असेल तेच टिकेल. आणि बाकीचं कालाच्या प्रवाहात वाहून जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. कारण निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचं दर्शन कुठे घडतंय आणि नुसतंच प्रदर्शन कुठे मांडलं गेलंय हे बरोबर कळतं.
नव्या युगातल्या नव्या अनुभूतींचं दर्शन हे सौंदर्यासंबंधीच्या नितीविषयीच्या वगैरे जुन्या रुढ कल्पनांशी कधी कधी जुळणारं नसेलही. मग तसल्या लेखनाच्या आड आपल्या नितीमत्तेच्या संरक्षणाची सबब सांगून शासन येईल. विद्यापीठातले पोटार्थी प्राध्यापक आणि विकत घेतलेले पत्रकार त्यांना साथ देतील. म्हणून लेखक जर दुरितांचे तिमीर जावो या भावनेने त्याला जाणवलेले सत्य कलापूर्ण स्वरुपात मांडत असेल, तर 'जो जे वांछील तो ते लाहो' च्या ठिकाणी 'जो जे वांछील तो ते लिहो' अशी आपली धारणा पाहिजे. माणसाच्या सुकृती इतकीच माणासातली विकृती हे ही एक सत्य आहे. अश्या विकृतीची चित्रे साहित्यात आता ह्या विज्ञानयुगात येणं अपरिहार्य आहे. वैज्ञानिक बुद्धीला आपल्या चुका कबूल करायला संकोच वाटत नाही. पण जो जे वांछील तो ते लिहो म्हटल्यावर लगेच आपल्यापुढे माणसांच्या वासना चाळवणारे त्यांच्यातल्या द्वेषभावनांना प्रोत्साहन देणारे असे लिखाण उद्या अधिकाधिक प्रमाणात लिहिले गेले तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न उभा राहिल ! हे लेखक समाज रसातळाला नेणारे लेखन करतील या भितीचा बागुलबुवा उभा करुनच सरकार सेंसॉर बोर्ड वगैरे स्थापन करीत असते. आणि संस्कृतीसंरक्षणाचा झेंडा घेऊन स्वत:ची संस्कृती तीच खरी संस्कृती असे मानणारे लोक अस्तन्या वर करुन पुढे सरसावतात.
साहित्याने पिढी बिघडवण्याची भाषा तर प्रत्येक पिढीत चालू आहे. मार्क ट्वेन ह्या विनोदी लेखकाचे यंग टॉम सॉयर हे शाळकरी वयातल्या पोरांच्या खोडकर लिलांचे अतिशय मजेदार दर्शन घडविणारे पुस्तक आहे. ते वाचून मुले बिघडतील म्हणून अमेरिकेतल्या एक-दोन संस्थानांतल्या संस्कृतीसंरक्षक सरकारांनी त्यांच्यावर बंदी आणली होती. इंग्लिश संस्कृतीसंरक्षकांनी शॉ च्या पिग्मॅलियन नाटकात नुसता डॅम हा शब्द आल्यामुळे सगळी संस्कृती रसातळाला चालली आहे असे समजून नाटक करणाऱ्यांना किती छळले यावर एक ग्रंथ लिहिला गेला आहे. मराठी भाषेत एके काळी संततिनियमन हा शब्द मोठ्याने उच्चारायची भिती होती. त्यासाठी शकुंतलाबाई परांजपे आणि र. धो. कर्वे यांचा किती छळ झाला होता! आता प्राथमिक शाळांच्या भिंतीवर आतल्या बाजूने शिवाजी महाराजांचा फोटो असतो आणि बाहेरच्या बाजूला निरोधची सरकारी जाहिरात असते. म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला भविष्य सुखाचा जावो म्हणून दिलेला सावधगिरीचा इशारा! आता छत्रपतींच्या मुळे मुलांच्यातली नुसतीच पूर्वजपूजा वाढेल म्हणून ती तसबीर काढून टाकायची की संततीप्रतिबंधक उपायांचे ज्ञान फार लवकर झाले तर पोरांची निती बिघडेल म्हणून जाहिरातीवर डांबर फासायचे? दोन्ही करण्याची आवश्यकता नाही. भिंतीच्या या दोन्ही बाजू सुबुद्धपणाने पहाता कशा येतील याची दृष्टी समजाला मिळणे हे इथे आवश्यक आहे.
जो जे वांछील तो ते लिहो यामागे जीवन अधिक सुंदर करण्यासाठी, दुरितांचे तिमीर घालवण्यासाठी, ही भावना नसेल तर कालनिर्मितीच्या मुख्य प्रेरणेशीच ही प्रतारणा होईल. आणि म्हणून इथे लेखक आणि वाचक या दोघांनाही आपली जबाबदारी कळायला हवी.