कोठे शांति, तुझा निवास ? वसशी तूं प्रीति, कोठे ? सुखा,
कोठे मंगल धाम रे तव ? धरा कीं स्वर्ग पाताळ कीं ?
लोकीं अन्य निवास का ? पडतसे छायाच येथे निकी,
तार्यांचा पडतो प्रकाश धरणीभागीं तसें हेहि का ?
विद्युद्दीप, हिरे, विमान, अथवा तारा, सिनेमांतरीं
किंवा कांचन-कामिनींत वसतां ? तारुण्य-बाल्यांत कीं ?
देव्हार्यांत मनाचिया पहुडतां गंभीर निद्रासुखीं ?
धुंडूं मी कवणे स्थळीं ? कुणि सखा दावील का हो तरी ?
किंवा केवळ अर्थशून्य असती हे शब्दची पोकळ
जैसें सुंदर नील हें नभ दिसे, अस्तित्व नाहीं परी ?
शोधूं जा तरि दूर दूर पळती हीं चक्रवालापरी
किंवा ही मृगतृष्णिका फसविते भोळ्या जनां केवळ ?
चाले नित्य अकांडतांडव इथें शोधार्थ यांच्या फुका,
देवा, तूं निजलास का ? तुज दयामाया मुळीं नाहिं का ?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.