"नितांत झाली शांत निशा ही; गगनाच्या प्रांतीं

गिरिशिखरीं, तरुशिरीं, धरेवरि पसरे ही शांती.

चांदीची चंद्राची नौका क्षीरसागरांत

मूक कशी चालली न करितां सळसळ बघ शांत.

प्राणायामपरायण वायू एकांतीं बसला,

मौन धरुनि मुनि - निसर्ग सखया, समाधींत थिजला.

दाहि दिशा या उज्ज्वल सखया, न्हाउनि माखोनी

ध्यानीं रतल्या शुभ्र पातळें पवित्र लेवोनी.

सोनेरी हें पानहि गळतां सळसळ सहवेना.

कांटा येई शरिरिं, शांतिचा छळ हा बघवेना. १

केवळ माझ्या ह्रदयाचे हे ठोके टिकटिकती,

तेच मात्र कानावर येती, भंगति शांति किती !

मीच पिशाच्यापरी तुझ्यासह सखया रे, जागें;

नीज शिवेना मज पाप्याला तळमळ ही लागे."

"शांत पर्विं या काय पहाया हवा चमत्कार ?

माझ्या मागें येइं, शांतिचें पाही माहेर.

गिरिमुख बोले, तरुगण हाले, थिजति शिला जागीं,

मुळुमुळु रडती ओहळ परिसुनि त्या काननभागीं.

आवर वस्त्रें, सळसळूं न दे, पाउल वाजो ना,

चाल हळुहळू, पानें वाजुनि शांती लाजो ना. २

मला वचन दे, अधीं शपथ घे, उगा न हलशील;

शब्द कशाचा, श्वासहि अपुला रोकुनि धरिशील.

भिंत चालली, रेडा बोले वेद, चमत्कार

तुला वाटती असत्य तरि ये, जपुनी परि फार."

हात ठेवुनी हातीं त्याच्याशपथहि गंभीर

घेउनि बोले सखा, "चल, कधीं ढळे न मम धीर."

गिरिच्या पश्चिमभागीं जेथे झाडी घनदाट,

पाऊलहि ठेवणें न सोपें अशी बिकट वाट,

चंद्राचे कवडसे पडोनी वाट दिसे न दिसे,

असे चालतां जपुनि जपुनि तें स्थळ अंतीं गवसे. ३

विहिर निमुळती जणूं काय ती गुहा तिथे खोल

बसले जाउनि गिरिमुख तें तों बोले हे बोल

"अनिदिनिं अनुतापें तापलों रामराया,

परमदिनदयाळा, नीरसी मोहमाया;

अचपल मन माझें नावरे आवरीतां

तुजविण शिण होतो, धाव रे धाव आतां !'

त्रिविध ताप तापवी दयाळा, भाजुनि मी गेलों,

शांत होइना दाह म्हणोनी शरण तुला आलों.

पलीकडे त्या पुरश्मशानीं हाय काय चाले !

भुतें घालिती पिंगा त्यानें धरणीही हाले. ४

मायेनें मारितो त्या स्थळी भाऊ बहिणीला,

बाप कापतो गळा मुलीचा, गिळी स्वमांसाला !

शास्त्रें लेकीसुनांस छळिती अपुल्या ज्ञानानें;

अज्ञानाला ज्ञान मानिती जणों सुरापानें.

माय-बहिणिच्या कर्कश ऐशा आक्रोशा रामा,

श्रवणमनोरमा गान मानुनी करिती आरामा.

न्याय करी अन्याय, आचरी नीति अनीतीला;

प्रीति भीति घे प्रिय विषयाची भिऊनि रीतीला.

सुखास भाळुनि ते आवळती उरास दुःखाला;

एक दुज्याशीं वैर लाविती शांति मिळायाला. ५

सत्त्व सोडुनी माती सजविति सदा अलंकारें,

स्वरूप सोडुनि रूपा भलत्या भाळति ते सारे.

अखंड चाले उदंड यापरि नाच पिशाचांचा,

घातपात तो कसा कळेना तिथे तयां त्यांचा.

उलटीं त्यांचीं खरीं पाउलें, उलटी ही चाल,

उलटें काळिज, उलटें सारें घेति करुनि हाल !

चुकुनि दयाळा, सुखार्थ त्यांतच जाउनि मी शिरलों,

हाय जळालों ! हाय पोळलों ! सुखास अंतरलों."

क्षणार्ध पावे विराम ह्यापरि गिरिमुख बोलुनिया,

द्विगुणित बाणे शांति, श्वासहि येई श्रवणीं या. ६

कळवळला तों सखा, लोटला अश्रूंचा पूर,

क्षणोक्षणीं वाटे कीं फोडिल किंकाळी घोर,

जी किंकाळी क्षणीं दुभंगुनि शांती निमिषांत,

पुण्यात्म्याचें चिंतन भंगुनि करील कीं घात.

क्षणोक्षणीं वाटे कीं आतां पळतचि जाईल;

'नष्ट सखा सांपडला' नगरीं डंका पिटवील.

वचनबद्ध तो स्थळगांभीर्ये परी स्थळा खिळला;

कंठ निरोधुनि अढळ बसे जरि धैर्यगिरी ढळला.

एकवार तें फिरोनि गिरिमुख लागे बोलाया,

"प्रभो, अनंता, दयासागरा, जगदात्म्या, राया ! ७

तव सहवासीं शांति खरी, सुख खरें, खरी प्रीती,

म्हणुनि चरण मीं धरिले, आलों शरण विविधरीती.

तुजसंगें मी करीन हितगुज, तुजशीं गार्‍हाणें,

लोळण चरणीं तुझ्या, तुझ्याविण जिणें दीनवाणें !

बळकट धरिली कास तुझी हरि, आतां करितील

षड्रीपु माझें काय ? यमाचे पाशहि तुटतील.

धना, मनाला आतां माझ्या करिशिल तूं काय ?

वळवळ खळबळ तुझी संपली, सरे हायहाय !

तरुवर्देतिल फळेंमुळें रे, ओहळ जळ मजला;

दिशा पांघरुण, उशा-अंथरुण मला शिला मृदुला. ८

कामा, गाजव शौर्य तुझें जा भूतांवरि जाण;

प्रीतिमदें झिंगले तयांवर सोड कुसुमबाण.

लोभा, आतां खुशाल गाजव अमल धरेवर जा,

क्रोधा, क्षोभव दुर्बलांस जा, तुज येथोन रजा.

फुलांवरुनिया फुलांवरि झुके फुलपांखरुं जेवी

प्रीति, तूंहि जा नाच सुखानें नगरांतुनि तेवी.

मोहा, मोहिव मोहिनिरूपें असुरां जाऊन,

शिवास शिव जा नाचव त्याला भिल्लिण होऊन.

मदा, तुझा उन्माद काय रे मायेवांचून ?

जा ज आणीं रावण कोणी, पाहीं शोधून. ९

अरे मत्सरा, विजनगव्हरीं काय तुझें काम ?

क्षण न उभा राहीं रे, येथे वसतो श्रीराम.

काय अतां तुमच्याशी नातें ? सरला संबंध !

बळिया माझा पाठीराखा केवळ आनंद !

मरणाला आणीन मरण मी, मरेल ब्रह्मांड !

उरेन माझा मीच निरसतां सारें थोतांड."

गिरिमुख विरमे, तरुगणहि गमे ध्रुवपद हें गाई,

'मरणाला आणीन मरण मी !' गाति दिशा दाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel