तव नयनिं उजळले बालरवी,

फूले ह्रदयिं मम उषश्छवी.

ह्रत्क्षितिजीं मम कनकमनोरम

राग उसळला उधळुनि कुंकुम;

तिळभर न उरे कोठेही तम;

न्हाले बाग सखे; विभवीं १

पिशाच जैसें, धुकें वितळलें;

चोर पळाले घूक दडाले;

सज्जन निज सत्कर्मि गुंतले,

पक्षिबंदिगण तुला स्तवी. २

गृढ गहन ह्रद्भाग झळकती,

प्रगटति रत्‍नें तळिं दडलीं तीं;

राज्य तुझें या मुलुखावरती,

धेइं सुखें जी वस्तु हवी. ३

तुझें प्रिये, साम्राज्य याचपरि

ह्रदयाच्या माझ्या मुलुखावरि

यावज्जीव टिको दृढ सुंदरि,

हेंच हरीला मी विनवीं. ४

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel