कुणि कोडें माझें उकलिल का ?
कुणि शास्त्री रहस्य कळविल का ? ध्रु०
ह्र्दयिं तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरि माझ्या उजळे;
नव रत्नें तूं तुज भूषविलें,
मन्मन खुललें आंतिल कां ? १
गुलाब माझ्या ह्र्दयीं फूलला,
रंग तुझ्या गालांवर खुलला;
कांटा माझ्या पायीं रुतला,
शूल तुझ्या उरिं कोमल कां ? २
माझ्या शिरिं ढग निळा डवरला,
तुझ्या नयनिं पाउस खळखळला;
शरच्चंद्र या ह्रदयिं उगवला,
प्रभा तुझ्या उरिं शीतल कां ? ३
मद्याचा मी प्यालों प्याला,
प्रिये, तयाचा मद तुज आला;
कुणीं जखडिलें दोन जिवांला
मंत्रबंधनीं केवळ ? कां ? ४
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.