घट भरे प्रवाहीं बुडबुडुनी-

न दिसे तुज का न पडे श्रवणीं ? ध्रु०

पदर गळाला, उडे वायुवर,

कुरळे उडती केसहि भुरभुर,

प्रमदे, बघ त्यां सांवर, आवर-

कां उभी प्रवाहीं शून्य मनीं ? १

स्वैर गार या झुळका वाहति,

मातीचा ये वास सभोवति,

क्षितिजीं बघ ढग वरवर चढती,

बघ घरा निघाल्या सोबतिणी. २

सळ डोळ्यांवर, काय पाहशी ?

कान देउनी काय ऐकशी ?

अचंचळ उभी व्याकुळ दिसशी-

का उचलिल घट येवोनि कुणी ? ३

पाउल नच तें, शेत सळसळे;

शब्द न मानवि, तारा बोले;

शीळ न, वायुच वंशीं खेळे;

कां विरघळशी भ्रमिं फिरफिरुनी ? ४

कवळुनि पद जल थरारुनि हले;

स्पर्शुनि शरिरा वारा बरळे,

वेलि हसति तुज फुलुनि बघ फुलें,

डोलती विनोदें तरु बघुनी ! ५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel