रे हिर्‍या माझिया झलक घरीं !

रे झळक उरीं ! तूं झळक उरीं ! ध्रु०

जरी घरोघर दिवे विझविले,

जरि घोरत जन सारे निजले,

शांत शक्क चहुंकडे जाहलें,

किर्र बोलते रात्र जरी- १

स्वप्नभूमिंतिल जैशा हांका

कोल्हे देती एकमेकां,

प्रतिध्वनी भयसूचक जरि का

वाहत येई खोल तरी- २

आकाशाच्या जरी अंगणीं

देवहि निजले दिवे विझवुनी;

गाढ ढगांच्या फटींमधूनी

चोरापरि शशि बघे जरी- ३

शांति असो कीं वीज कडकडो,

अचल असो नभ, कडाडुनि पडो,

शेष डगमगो, धरा तडतडो,

क्षिती तयांची कोण करी ? ४

प्रकाशभाषा तुझी मधुर ती

गोंधळ उडवो इतरां चित्तीं;

कळेल मज ती सुंदर गीती,

प्रळयमेघ गर्जले तरी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel