आह्वानशृंग तव तीव्र कसें !
रे मरण, सुटे पळ, भरे पिसें. ध्रु०
विसरे जन कीं हवी शिदोरी,
विसरे तांब्या, विसरे दोरी,
विसरे वस्त्रें जुनिं कीं कोरीं,
मग तुमान-धोतर कोण पुसे ? १
विसरे कीं मज मार्ग न ठावा,
उजेड कीं अंधार मिळावा,
स्नेह मिळे कीं मिळेल दावा,
मग धीर नसे वा भीति नसे. २
ह्या जगतांतिल सार्या गीती
जरि काकुळती धावत येती,
स्वर-जालीं चरणां आवाळिती,
मग कुठलें रडणें, काय हसें ? ३
आशेनें कीं नैराश्यानें,
माधुर्यानें कीं लवणानें,
भरे कुंभ जो क्षणाक्षणानें
निमिषांत तुझ्या पदिं वाहतसे. ४
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.