मंदिरीं मना, तव गान भरे
कुणिकडे बघशि आश्चर्यभरें ? ध्रु०
सप्त सुरांचें त्यास न बंधन,
अडखळे न तें ज शब्दांतुन,
माधुर्यच माधुर्य भरे, मन,
माधुर्याविण कांहिं न दुसरें. १
तेंच फुलांच्या मार्दविं फुललें,
सुवर्णवर्णी उषेंत खुललें,
सायंतनिं तरु-गिरि- घनिं झुललें,
रे, उघड नयन, बघ नीट पुरें ! २
परि फुलास तूं पुसशी भलतें-
औषध, आसव का देशिल तें ?
चिरतां चुरतां तुज का मिळतें ?
छे ! चल मग निघ, तव डौल पुरे ! ३
हाय ! मना, तव कपाळ फुटलें,
तुझ्याच घरचें तुलाच न कळे,
जन्ममरणिं बघ खेटर न मिळे,
जा, फोड ऊर, तळमळ मर रे ! ४
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.