या प्रकाशशिखरीं कुणीकडुनी
मज चढविशि वाटाड्या, धरुनी ? ध्रु०
खोल दर्यांच्या घोर तमांतुनि,
काजळि काळ्याकुट्ट जळांतुनि,
वळणांतुनि, घन वनस्थळांतुनि
चढविलेंस कुठुनी वरि जपुनी ! १
मागें वळतां वाट नच दिसे,
पुढें पाहतां वाट न गवसे
पुन्हा पुन्हा मी म्हणुनि तुज पुसें,
रे, नेशिल कोठे मज अजुनी ? २
चढण अशिच का पुढेंहि राया ?
लागतील का सुंदर राया ?
विश्रांतिस मिळतील सराया ?
थकलों रे सखया, उत्क्रमणीं ! ३
तुझीं पाउलें येती कानीं,
धीर जरा ये जरी तयांनीं,
किति हिंडावें तरि रानींवनिं ?
तें दूर किती रे घर अजुनी ? ४
पार नसे रे तुझ्या कधीं ऋणा,
या शरिराच्या करुनि वाहणा
वाटाड्या, घालिन जरि चरणां
तरि उतराई होणें ज जनीं. ५
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.