त्या दारावरुनी कोण निघे ?

वाराही चोरापरी रिघे. ध्रु०

निद्रारस संध्या न शिंपडे,

चंद्र शांतिचा सडा न तिकडे

करुनी निसटे चोरसा गडे,

नभ उघडुनि डोळे कधिं न बघे. १

सुवास-सुरिं गे फुलें न गाती,

परस्परीं नच कधिं कुजबुजती,

सुखदुःखाच्या गोष्टि न करिती,

यम घुमटीं काळी घोंगडि घे. २

तिथे न मानव, भुतेंच जमती,

न कळे खिदळति किंवा झुंजति,

नाण्याच्या नादावर नाचति,

गे विचित्र चाळे ते अवघे ! ३

आपण फिरकूं तिथे न सुंदरि,

बसोनि राहूं गे घरचे घरिं,

घरींच घुमवूं गोड बांसरी,

कधिं नांवही न त्या घरचें घे. ४

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel