या वेळीं माझ्या ये रमणा,

शांतीची द्वाहि फिरे सजणा. ध्रु०

गहन रात्र घनघोर पसरली,

जादुगार झोपेनें अंगुलि

चहूंकडे हळुहळू फिरविली,

ती मिटवी कमळापरि नयनां.

अधांतरीं बघ घरटीं झुलतां

गुपचुप झाली बघतां बघतां,

तरुंच कुजबुज थांबली अतां,

वेळूंची थिजलि सख्या, वीणा.

नभें दाट पांघरली दुलई,

मात्र मिणमिणे घरांत समई,

कीं तुज वाट दिसो या समयीं,

कामातुर जागें तुझ्याविना.

कानोसा मी घेतां थकलें,

तुझीं न ऐकूं येति पाउलें,

कां मग मजला वेड लाविलें ?

किति विलंब करिशिल आगमना ?

फटफटतां होईल कशी गति ?

दारीं ठोठावतील रे किति ?

सळोपळो मज करितिल रे अति,

तुज ठावा त्यांचा क्रूरपणा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel