गे शपथ तुझी, मी वदें खरें,
मी स्पर्शें तुझिया मज विसरें. ध्रु०
सुखदुःखाची मादक वारुणि
गोड जहाली तुझ्या कारणीं,
उन्मादीं कळ कळे न रमणी,
कडुपणांत गोडी प्रिये, भरे. १
गृहकर्मीं कीं राजकारणीं,
सुखशयनीं, बाजारीं, भ्रमणीं,
हरिभजनीं कीं भयानक रणीं,
गे गुप्त तुझी मूर्ति विचरे. २
गार गारगोटींत ज्यापरी
गुप्त अग्नि वावरे सुंदरी,
दुनियेच्या हाटांत खरोखरि
गे गुप्त उजेड तुझाच पडे. ३
सागरावरी ओहटि-भरती,
शांत लहरिवर किरण नाचती,
तुफान हा, तारवेंहि फुटती,
या विविधरूपिं जळ एक भरे. ४
त्यापरि माझ्या विविध तरंगीं
विविध रंगिं तूं रक्तिमरंगी;
विविध रूपिं तूं अविविधसंगी,
माझेपण तुझिया उरीं मुरे. ५
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.