घातली एकदा अतां उडी,

रे, बुडव लाव वा पैलथडी ! ध्रु०

साहस म्हण कीं पोरपणा म्हण,

पण गेली ती परते न घडी. १

मोह अचानक पडे मजवरी,

खर्कन पदरचि गळे पळांतरिं,

नग्नचि झालेंन कळत सत्वरि,

तूं घाल शाल, टाकीं उघडी. २

आतां कैचें मागें वळणें ?

तुजसह लाटांवरि रे झुलणें,

तुझ्यासमोरचि जगणें मरणें,

तूं नाविक आतां तूंच गडी. ३

सर्वस्वी रे अपराधी मी,

लबाड म्हण कीं म्हण साधी मी,

विचार केला नच आधीं मीं,

तूं क्षमा करीं अथवा ताडीं. ४

आतां कांहिं न रे माझ्या करिं,

सर्वस्वी रे भार तुजवरी,

मार तार ! छळ करीं ! प्रीति करिं !

घेतली तुझ्या मीं उरीं बुडी.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel